प्रतिनिधी /बेळगाव
शासन एकीकडे वीज वाचवा, असे आवाहन करते, तर दुसरीकडे शहरात प्रशासनाकडून विजेचा अपव्यय होताना दिसत आहे. वडगाव-अनगोळ मार्गावर रविवारी दुपारपर्यंत पथदीप सुरूच होते. त्यामुळे नागरिकांतून प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत होती.
हेस्कॉमकडून वीज तुटवडय़ाचे कारण पुढे करून वीजपुरवठा खंडित केला जातो. तर दुसरीकडे विद्युत खांबावर सुरू असलेल्या दीपांमुळे वीज वाया जाण्याचे प्रकार सुरू आहेत. वेळेत वीजखांबावरील पथदीप बंद करण्याकडे दुर्लक्ष होऊन विजेचा अपव्यय होत आहे. शहरातील पथदीप बंद करण्याचे कंत्राट असलेल्या व्यक्तीकडून वेळेवर पथदीप बंद केले जात नसल्याने अतिरिक्त वीज खर्ची पडत आहे.
वडगाव-अनगोळ रोडवर सातत्याने पथदीप वेळेवर बंद केले जात नसल्याने वीज वाया जात आहे. नागरिकांनी तक्रार करूनदेखील परिस्थिती जैसे थेच आहे. एकीकडे वीजपुरवठा खंडित केला जातो तर दुसरीकडे विजेचा अपव्यय होतो. याबाबत नागरिकांतून आश्चर्यही व्यक्त होत आहे. कंत्राटदाराने लक्ष घालून खांबावरील पथदीप वेळेत बंद करावेत, अशी मागणी होत आहे.









