गेल्या काही वर्षापासून पर्यावरणाची झालेली हानी आणि निसर्गाचा असमतोल यामुळे गेल्या काही वर्षापासून सातत्याने महाराष्ट्राला एकामागून एक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना चांगलेच जेरीस आणलेले असल्याने शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून सरकारने जाहीर केला असून, त्या अनुषंगाने 16 मे 2023 रोजी सरकारने निर्णय घेतला. आता पावसाळा सुरू झाला असल्याने शहरी भागातील पावसाळी समस्यांचे सरकारसमोर मोठे आव्हान असणार आहे. मुंबईत पाऊस पडल्याने गारवा आला असला, तरी राजकारण मात्र तापलं आहे. मुंबईतील अनेक सखल ठिकाणी पाणी भरले आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांना लक्ष्य करण्याची संधी साधली. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पहायला मिळाले. मुंबई महापालिकेची निवडणूक कधी होणार? हा प्रश्न जरी सध्या अनुत्तरीत असला तरी महापालिका निवडणूकांच्या अनुषंगाने आतापासून जोरदार राजकारण सुरू झाले आहे. पहिल्याच पावसात गटारे तुंबल्याने अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे बघायला मिळाले त्यातच या पहिल्याच पावसाचे राजकारण करत जोरदार आरोप प्रत्यारोपाला सुरूवात झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिल्याच पावसात मुंबई तुंबल्याचे विचारले असता त्यांनी पावसाची तक्रार काय करता, पावसाचे स्वागत करा असे वक्तव्य केल्याने विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले. राज्यातील इतर भागात होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपेक्षा मुंबईतील पाऊस हा काही तासात सर्व व्यवहार विस्कळीत करतो. मुंबईची भौगोलिक रचना आणि मुंबईत नाल्याशेजारी असणाऱ्या झोपडपट्टी काही भागात तर दरडीवर असणाऱ्या झोपडपट्ट्या तसेच जुन्या तसेच मोडकळीस आलेल्या इमारती, संरक्षक भिंती या पावसाचा जोर वाढल्यानंतर कोसळतात आणि काही लोकांचे दरवर्षी नाहक बळी जातात. त्यामुळे मान्सूनपूर्व नालेसफाई बरोबरच मुंबईत पावसाळ्यापूर्वी अनेक उपाययोजना केल्या पाहिजेत. मात्र त्या कधीच होताना दिसत नाहीत. त्यातच सध्या मुंबई महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने जे जीव घेऊन मुंबईतील धोकादायक भागात राहत आहेत त्यांना कोणी वाली नाही. मुंबई महापालिकेचा कारभार हा प्रशासनाकडे आहे. त्यातच शिवसेना उध्दव ठाकरे, भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात रोज आरोप प्रत्यारोप सुरू असल्याने प्रशासन याचा पूरेपूर फायदा घेताना दिसत आहे. वास्तविक मुंबईसारख्या मोठ्या महापालिकेचा कारभार प्रशासनावर अवलंबून असणे हेच धोक्याचे आहे. मुंबई महापालिकेत 2017 ला शिवसेनेने सत्ता आली शिवसेना आणि भाजपात केवळ 2 जागांचा फरक असताना भाजपने पालिकेत आम्ही पहारेकऱ्यांची भूमिका बजावू असे सांगताना सेनेला सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला. तर 2017 पूर्वीपासून शिवसेना आणि भाजप हे महापालिकेत सत्तेत एकत्र होते मात्र आता संसार मोडल्याने शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजप मात्र ज्या पध्दतीने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. त्यातच कोव्हिड काळातील पालिकेतील अनियमिततेबाबतची चौकशी लावल्याने यात काही पालिका अधिकारी तसेच उध्दव ठाकरे यांचे निकटचे ईडीच्या रडावर आले आहेत. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आक्रमक लढाईला सुरूवात झाली आहे. आता हे राजकारण केवळ सभागृह किंवा मैदानापुरते मर्यादित राहीले नसून आता एकमेकांच्या विरोधात रस्त्यावर उतऊन निकराची लढाई होणार हे स्पष्ट होत आहे. ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्या नेतफत्वात 1 जुलै रोजी महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असून “मुंबईकरांच्या पैशांची लूट” होत आहे मुंबई महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नसताना रस्ता काँक्रिटीकरणासाठी काढलेले मेगा टेंडर म्हणजे अक्षरश: मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी केली गेली आहे असा थेट आरोप ठाकरे गटाकडून सरकार आणि महापालिकेवर करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेत ठाकरे गटाच्या लोकांनी जे गैरधंदे केले त्याची एसआयटीमार्फत पोलीसांमार्फत चौकशी होणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मोर्चा काढण्यात येणार असून हा मोर्चा म्हणजे ‘चोर मचाए शोर’ असा प्रकार असल्याची टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली. तर कालच ठाकरे गटाची वांद्रे येथील अनधिकृत शाखा जमीनदोस्त केलेल्या पालिका अधिकार्यालाच शिवसैनिकांनी चोप दिला आहे. दुसरीकडे ठाकरे गटाच्या मागाठाणे येथील नगरसेविका रिध्दी खुरसुंगे यांच्या घरावर झालेला हल्ला पाहता आता भविष्यात शिवसेना ठाकरे गट विरूध्द भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे एकमेकांविरूध्द आक्रमक होणार असल्याचे दिसत आहे. आतापर्यंतचा आरोप प्रत्यारोपाचा हा खेळ आता थेट रस्त्यावर आणि हल्ला प्रतिहल्ल्याने होणार यात शंका नाही.मुंबई महापालिकेतील कोव्हिड काळातील भ्रष्ट्राचाराच्या आरोपाबाबत लावलेल्या चौकशी नंतर आक्रमक झालेल्या उध्दव ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ते थेट पीएम केअर निधीबाबत जोरदार आरोप केला. ते बघता भविष्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पालिकेतील अधिकारीच ईडीच्या रडारवर आल्याने अधिकाऱ्यांमध्येच असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून राजकारणात आमचा नाहक बळी जात असल्याची भावना या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यास हे अधिकारी यापुढे धजावणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण भाकरी फिरली की उट्टे काढले जाते आणि त्यात अधिकाऱ्यांचा बळी जातो. कालच आदित्य ठाकरे यांनी रस्ता बनविण्याच्या टेंडरमध्ये सहा हजार कोटीचा घोटाळा झाला असून आपले सरकार आल्यानंतर ज्यांना अटक करायची आहे ती आपण करू असे सांगितल्याने यापुढे आता अधिकारी वर्गाने निर्णय घ्यायचा की नाही त्याची अंमलबजावणी करायची की नाही? हा मोठा सवाल उपस्थित होत आहे.
Previous Articleकंत्राटी लष्कराचे बंड आणि आपण!
Next Article भारताची निंदा नको, कौतुक करा !
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








