यंदा मान्सून लांबल्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. कर्नाटकात येत्या आठवडाभरात पाऊस झाला नाही तर पिण्याच्या पाण्याचेही वांदे होणार आहेत. बिपरजॉय चक्रीवादळ आणि अल निनोच्या परिणामामुळे किमान आणखी महिनाभर पाऊस लांबण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. खरे तर 8 जूनलाच मान्सून केरळमध्ये आला असला तरी चक्रीवादळ आणि खराब हवामानामुळे त्याची वाटचाल रोखली गेली. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगढ, झारखंड आदी राज्यात दमदार पाऊस पडत होता. यंदा पाऊस तर नाहीच, वादळी वाऱ्याने जोर धरला आहे. त्यामुळे बेळगावसह अनेक जिल्ह्यातील केळी, पपई आदी फळबागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाअभावी पेरण्याही कमी झाल्या आहेत. गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात 12 लाख 97 हजार हेक्टर जमिनीत पेरण्या झाल्या होत्या. आता याच कालावधीत केवळ 5 लाख 42 हजार लाख हेक्टर जमिनीत पेरण्या करण्यात आल्या आहेत. 57 लाख 50 हजार हेक्टरमध्ये अन्नधान्याच्या पेरणीचे उद्दिष्ट होते. यापैकी केवळ 1 लाख 79 हजार हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. कर्नाटकातील एकंदर परिस्थिती लक्षात घेता पुन्हा एकदा दुष्काळाचा सामना करावा लागणार का? असा संशय निर्माण झाला आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात सरासरी 46 मि. मी. पावसाची नोंद व्हायची. यंदा केवळ 12 मि. मी. पाऊस झाला आहे. 9 जिल्ह्यातील 51 तालुक्यात तर पावसाने तीव्र ओढ दिली आहे. त्यामुळे बळीराजा आकाशाकडे नजर लावून बसला आहे. कर्नाटकातील नव्या सरकारसमोर नैसर्गिक आपत्तीचे आव्हान उभे ठाकले आहे. पावसासाठी ग्रामीण भागात देवांना साकडे घातले जात आहे. बेडकांची आणि गाढवांची लग्ने लावली जात आहेत. अनेक ठिकाणी पर्जन्यहोम सुरू आहेत. सद्यपरिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. राजकीय पक्षांना या परिस्थितीचे काहीच पडलेले नाही. सत्ताधारी काँग्रेस व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपमधील कलगीतुरा सुरूच आहे. आता वीजदरवाढीवरून दोन्ही पक्ष एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. महिलांसाठी मोफत बसप्रवासाच्या शक्ती योजनेच्या अंमलबजावणीमुळे प्रवासी महिलांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. खासकरून राज्यातील धार्मिक ठिकाणांवर गर्दी होते आहे. ही योजना सुरू होण्याआधीच महिलांनी आपला टूर प्लॅन ठरवून ठेवला असावा. प्रमुख धार्मिकस्थळांच्या मार्गावरील बसेस महिला प्रवाशांनी भरल्या आहेत. सुरुवातीच्या दोन दिवसात 41 लाख 34 हजार महिलांनी राज्यभरात प्रवास केला आहे. आता काँग्रेसने निवडणुकीत दिलेली दुसरी गॅरंटी दरडोई 10 किलो तांदूळ देण्याच्या योजनेला 1 जुलैपासून सुरूवात होणार असल्याचे बोलले जात होते पण याची शाश्वती दिसत नाही. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आधी या योजनेसाठी तांदूळ देण्याची तयारी ठेवली होती. केवळ दोन दिवसात शब्द फिरविण्यात आला आहे. मुबलक साठा नसल्याचे सांगून सरकारी योजनेसाठी तांदूळ देण्यास नकार दिला आहे, असा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी तातडीच्या पत्रकार परिषदेत केला आहे. परिणामी सदरची योजना नियोजीत तारखेला सुरु होणार का अशी शंका दाटू लागली आहे. या आगामी 15 दिवसातल्या घडामोडीनंतर योजनेबाबतच्या कार्यवाहीबाबत स्पष्टीकरण होऊ शकणार आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आडून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. गरीबांना मोफत तांदूळ मिळू नये म्हणून केंद्र सरकार कर्नाटक सरकारला तांदूळ विकण्यास नकार देत असल्याचा गंभीर आरोपही सिद्धरामय्या यांनी केला आहे. केंद्राने आपली भूमिका मांडली तरी एकदा योजना सुरु केल्यानंतर तांदळाचे वाटप न झाल्यास जनता राज्य सरकारलाच धारेवर धरणार आहे, हे विसरुन चालणारे नाही. तर दुसरीकडे भाजप नेतेही आक्रमक बनले आहेत. शब्द दिल्याप्रमाणे 1 जुलैपासून दरडोई 10 किलो तांदूळ द्या, अशी मागणी करीत काँग्रेस नेत्यांची अवस्था ‘नाचता येईना, अंगण वाकडे’ अशी झाली आहे, अशा शब्दात भाजपने टीका केली आहे. वीजदरवाढी विरोधात संपूर्ण राज्यात आंदोलने सुरू आहेत. आम्ही काय करणार? या आधीच्या भाजप सरकारने दरवाढ केली आहे, असे सांगत दरवाढीला भाजप कारणीभूत आहे, असे काँग्रेस नेत्यांनी जाहीर केले आहे. आम्ही दरवाढ केली नाही, दरवाढीची शिफारस केईआरसीने केली होती. तरीही आम्ही या शिफारशीला मान्यता दिली नाही. काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर वीजदरवाढ झाली आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी काँग्रेस सरकारवर केला आहे. यावर औद्योगिक मंत्री एम. बी. पाटील यांनी हवे तर आमच्याजवळ पुरावे आहेत. प्रसंग आला तर पुरावे उघड करण्याची आपली तयारी आहे, असे जाहीर केले आहे. प्रत्येक घराला 200 युनिटपर्यंतची वीज मोफत मिळणार या आशेने मोफत विजेच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्नाटकातील नागरिकांना काँग्रेस सरकारने मोठा झटकाच दिला असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार शामनूर शिवशंकरप्पा यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारवर टीका केली आहे. जसे जाहीर केले आहे, तशी योजना लागू करा, अशी मागणी केली आहे. आता भाजपमध्ये वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी भाजपमधील काही नेत्यांनी हातमिळवणी केली आहे, असा आरोप खासदार प्रताप सिंह यांनी केला आहे. निवडणूक निकालानंतर एक महिन्याने भाजपमधील सुंदोपसुंदी उफाळून आली आहे. तुझी पाठ मी खाजवतो, माझी पाठ तू खाजव, या न्यायाने एकमेकांच्या पाठी खाजवण्यात काही भाजप नेते धन्यता मानत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सी. टी. रवि, खासदार रमेश जिगजिनगी, आमदार व्ही. सुनीलकुमार आदी नेत्यांनीही आपल्याच पक्षाच्या नेतृत्वाविरुद्ध खदखद व्यक्त केली आहे. जर भाजप नेत्यांशी तुमची गुफ्तगू नसेल तर निवडणुकीच्या काळात सरकारवर केलेल्या 40 टक्के कमिशनच्या आरोपांची चौकशी करा, अशी मागणीही खासदार प्रताप सिंह यांनी केली आहे. आपल्याशी कोणाचीही हातमिळवणी नाही. कोणी हातमिळवणी केली आहे यासंबंधी तुम्हीच खुलासा करा, असे सांगत सिद्धरामय्या यांनी भाजप नेत्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.
Previous Articleजलस्रोतांचा खजिना : भीमगड
Next Article संसाराला कोणताही सत्यार्थ नसतो
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








