कुत्र्याच्या नसबंधी प्रक्रिया गतीने राबविणार : सांगली, मिरजेत डॉग पौंडही सुरू होणार : आयुक्त सुनील पवार
सांगली : मोकाट कुत्र्याचे वाढते हल्ले लक्षात घेता भटकी श्वान नियंत्रणासाठी महापालिका अॅक्शन मोडमध्ये आली आहे. श्वान नियंत्रणाबाबत तातडीने अॅक्शन प्लॅन तयार करण्यात येणार असून उद्या शनिवारपासून दोन सत्रात मोकाट श्वान पकडण्याची मोहिम हाती घेतली जाणार असून पकडलेल्या श्वानांची नसबंधी प्रक्रिया गतीने राबविण्यात येणार आहे. याचबरोबर सांगली मिरजेत डॉग पौंडही सुरू करण्याबाबत तातडीने निर्णय घेतले जातील असे आयुक्त सुनील पवार यांनी सांगितले. याचबरोबर डॉग विभागाला सर्व सुविधा तात्काळ पुरवल्या जातील मात्र श्वानाबाबत नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यास त्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाईचा इशारा आयुक्त सुनील पवार यांनी दिला.
वाढत्या श्वान हल्ल्याचे प्रकार लक्षात घेऊन मनपाक्षेत्रात असणाऱ्या मोकाट श्वानांच्या नियंत्रणाबाबत उपाययोजना करण्याच्या उद्देशाने आयुक्त सुनील पवार यांनी मनपा पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक आणि प्राणीमित्र यांची संयुक्त बैठक आज बोलावली होती.