अपघातांमुळे वाहनधारकांना धोका
उचगाव : बेळगाव-बाची या बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील 15 किलोमीटर अंतराच्या पट्ट्यामध्ये रस्त्याच्या दुतर्फा अनेक मांसाहारी आणि शाकाहारी खानावळी आणि हॉटेल्स असल्याने या हॉटेलच्या शेजारी भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे बेळगाव-बाची मार्गावर ये-जा करणाऱ्या अनेक वाहनचालकांना अपघात होण्याचे प्रकार वाढले असून अनेक जणांना दुखापतीही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. संबंधितांनी याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवासीवर्गातून करण्यात येत आहे. बेळगाव बाची मार्गावरील हिंडलगा, आंबेवाडी क्रॉस, सुळगा, कल्लेहोळ क्रॉस, उचगाव, तुरमुरी, बाची या प्रत्येक गावाशेजारी मांसाहारी हॉटेल्स मोठ्याप्रमाणात आहेत. या हॉटेलमधील शिळे अन्न इकडे तिकडे टाकल्याने अण्णावरती भटकी कुत्री तुटून पडतात. यामुळे प्रवासी ये-जा करत असताना वाहनांच्या समोर ही कुत्री आडवी येत असल्याने मोठे अपघात घडत असून वाहनांचेही मोठे नुकसान झाल्याच्या अनेक घटना दिसून येत आहे. तसेच हॉटेल मालकांनीसुद्धा हॉटेलच्या सभोवती शिळे अन्न इकडे तिकडे न टाकता त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी, अशीही मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. या पट्ट्यामध्ये भटक्या कुत्र्यांपासून निर्माण झालेला धोका संबंधितांनी तातडीने दूर करावा, या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









