प्रतिनिधी/ सातारा
गोळीबार मैदान परिसरात भटक्या कुत्र्यांनी चांगलाच हैदोस घातला होता. या परिसरातील जवळपास तिन ते चार रहिवाश्यांचा चावा ही घेतला होता. याबाबत पालिकेला तक्रार ही करण्यात येत होती, पण कोणतीच दखल घेण्यात येत नव्हती. याबाबत तरूण भारतच्या वृत्तपत्रात बातमी ही नुकतीच प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार पालिकेच्या कर्मचाऱयांनी मंगळवारी सकाळच्या सुमारास येथील भटकी कुत्री अखेरीस जेरबंद करण्यात आली.
अगदी पहाटे 5 पासुन पालिकेच्या कर्मचाऱयांच्या वतीने ही मोहिम राबविण्यात येत होती. या परिसरातील एकुण 14 कुत्री जेरबंद करण्यात आली होती. याप्रसंगी समाजसेवक रवि पवार, पूनम निकम, गणेश निकम, राहुल भरमगुंडे आदींनी पालिकेच्या कर्मचाऱयांना सहकार्य केले. परिसरातील काही नागरिकांनी यामोहिमेला विरोध केला पण ही कुत्री सध्या किती हिंसक बनली आहेत, याबाबत सांगितले असता, त्यांनी या उपक्रमाला सहमती दर्शविली.
या परिसरातील सदरची भटकी कुत्री पालिकेने जेरबंद केल्याने परिसरातील नागरिकांकडुन समाधान व्यक्त करण्यात येत होते. कारण या परिसरातुन ये-जा करणाऱया नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. तसेच लहान मुलांमध्ये यांची चांगलीच धास्ती बसली होती.
चौकट
ही मोहिम संपुर्ण शहरासह हद्दवाढ झालेल्या भागांमध्ये ही राबविण्यात येणार आहे. तसेच ही भटकी कुत्री पकडुन त्यांचे निर्बिजीकरण करून त्यांना पुन्हा सोडण्यात येणार आहे. जेणे करून या कुत्र्यांचा नागरिकांना कोणताच त्रास होणार नाही. पालिकेचे संबंधीत कर्मचारी येवुन त्या-त्या भागातील भटकी कुत्री पकडुन नेणार आहेत, याकरीता परिसरातील रहिवाश्यांनी सहकार्य करणे ही तितकेच गरजेचे आहे.
सागर बडेकर
नगरपालिका अधिकारी








