दिवसभरात विविध ठिकाणी 7 कुत्री पकडली : मोहिमेत सातत्य ठेवण्याची मागणी
बेळगाव : शहर व उपनगरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे मंगळवारी महापालिकेच्या पशुसंगोपन विभागाकडून शहरात कुत्री पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली. दिवसभरात विविध ठिकाणी एकूण 7 कुत्री पकडण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. गल्ली-बोळात कुत्र्यांचे कळप ठाण मांडून बसत आहेत. रस्त्याने चालत जाणाऱ्या नागरिकांवर हल्ला करून चावा घेण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली असली तरीदेखील महापालिकेकडून ठोस उपाययोजना हाती घेण्यात आल्या नाहीत. कुत्र्यांचे निर्बिजीकरण अत्यंत संथगतीने सुरू आहे. पकडलेली कुत्री श्रीनगर येथील एबीसी सेंटरमध्ये घेऊन जातात. त्याठिकाणी यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाते. त्यानंतर ज्या ठिकाणाहून कुत्री आणलेली असतात पुन्हा त्याच ठिकाणी सोडून दिली जातात.
महापालिकेच्या पशुसंगोपन विभागात मनुष्यबळाची कमतरता आहे. वरिष्ठ पशुनिरीक्षक राजू संकण्णावर हे अन्य एका सहकाऱ्यांच्या मदतीने कुत्री व मोकाट जनावरे पकडत आहेत. त्यांच्याकडे असलेले वाहनदेखील नादुरुस्त झाले आहे. त्यामुळे कुत्री पकडताना इतर कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागत आहे. कुत्री कशा पद्धतीने पकडावीत, याबाबतचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना असणे गरजेचे आहे. मात्र बहुतांशवेळा कुत्री पकडण्यासाठी येणारे कर्मचारी नवखे असतात. त्यामुळे कुत्री पकडताना त्यांना परिश्रम घ्यावे लागतात. जिकडेतिकडे कुत्र्यांचे कळप फिरत असल्याने नागरिकांना भीतीच्या छायेखाली वावरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. सोमवारी महापालिकेच्या पशुसंगोपन विभागाकडून नार्वेकर गल्ली, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, खडेबाजार, चव्हाट गल्ली, सीबीटी, काकतीवेस, रविवारपेठ आदी ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा शोध घेऊन त्यांना पकडण्यात आले. दिवसभरात एकूण 7 कुत्री पकडण्यात आली. ही मोहीम कायमस्वरुपी सुरू ठेवावी, अशी मागणी बेळगावकरांतून केली जात आहे.









