नागरिकांचा चावा घेण्यासह मोटारसायकलींच्या सीटकव्हरची फाडाफाड
बेळगाव : शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला असून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात मात्र महापालिका अपयशी ठरली आहे. कांगली गल्लीत एका कुत्र्याने गेल्या काही दिवसांपासून हैदोस घातला आहे. नागरिकांचा चावा घेण्यासह त्या कुत्र्याकडून मोटारसायकलींचे सीटकव्हर फाडण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे उपद्रवी कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी रहिवाशांतून केली जात आहे.शहर आणि उपनगरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. कुत्र्यांच्या कळपाकडून शाळकरी मुलांसह महिला व आबालवृद्धांचा चावा घेतला जात आहे. त्याचबरोबर पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्याही वाढली आहे. हॉटेलमधील खरकटे टाकणाऱ्या भागात कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सातत्याने कुत्र्यांचे हल्ले वाढत असल्याने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचा ठेका दिलेल्या ठेकेदाराची मुदत संपली आहे. महापालिकेचे पशुसंगोपन विभागाचे वरिष्ठ निरीक्षक राजू संकण्णावर यांच्याकडून मोकाट कुत्र्यांची विविध ठिकाणी धरपकड सुरू आहे. पकडलेल्या कुत्र्यांवर श्रीनगर येथील एबीसी (अॅनिमल बर्थ कंट्रोल) केंद्रात नेऊन निर्बिजीकरण केले जात आहे. त्यानंतर शास्त्रक्रिया केलेली कुत्री पुन्हा त्याचठिकाणी नेऊन सोडली जातात. तरीदेखील कुत्र्यांची संख्या घटलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून शहरातील कांगली गल्लीतील एका भटक्या कुत्र्याने अक्षरश: हैदोस घातला आहे. नागरिकांचा चावा घेण्यासह घराबाहेर पार्क करण्यात आलेल्या मोटारसायकलींचे सीटकव्हरदेखील कुत्र्याकडून फाडले जात आहेत. दररोजच्या या उपद्रवामुळे रहिवासी वैतागले आहेत. याबाबत संबंधित ठेकेदाराला कुत्र्याचा बंदोबस्त करण्याबाबत संपर्क साधला असता, त्याने आपला ठेका संपला असल्याचे सांगत हातवर केले आहेत. त्यामुळे महापालिकेने याकडे लक्ष घालून कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.









