कोल्हापूर :
शहरात मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. परिणामी वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी ही जनावरे अपघाताला निमंत्रण ठरत आहेत. महापालिका प्रशासन या जनावरांचा बंदोबस्त करण्यात कमी पडल्याने कोल्हापूरकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शहरात रस्त्यावर फिरणारी तसेच रहदारीच्या चौकात ठाणं मांडलेल्या जनावरांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून या जनावरांमुळे अनेक ठिकाणी अपघातही झाले आहेत. महापालिका प्रशासन या जनावरांचा बंदोबस्त करण्यास कमी पडल्याने कोल्हापूरकरांचा त्रास वाढला आहे. महापालिकेकडून मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबविली जात असल्याचा दावा करण्यात येत असला तरी शहरातील रस्त्यांवर मात्र या मोकाट जनावरांचा सुळसुळाट दिसून येत आहे. रस्त्यांची दूरवस्था आणि वाहनांची संख्या यामुळे वाहतूक संथ गतीने होत आहे. त्यातच ऐन गर्दीच्या रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे अनेकदा अपघातसुद्धा होत आहेत. महापालिकेने याबाबत काही जनावर मालकांना दंड केला असला तरी त्याचा म्हणावा असा परिणाम दिसून येत नाही.

मोकाट जनावरांमुळे होणारा वाहतुकीचा खोळंबा, ही बाब कोल्हापूरकरांच्या डोकेदुखीत चांगलीच भर घालणारी ठरत आहे. ही जनावरे दिवसभर शहरात मोकाट फिरत असतात. ऐन चौकात, रस्त्याच्या मध्यभागी किंवा गर्दीच्या ठिकाणी त्यांनी ठिय्या मारलेला असतो. विशेषत: शहराच्या गर्दीच्या ठिकाणी मोकाट जनावरांचा त्रास अधिक आहे. त्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. शहरात दसरा चौक, सीपीआर चौक, बिंदू चौक, महापालिका चौक, राजारामपुरी, शाहूपुरी धान्य लाईन बझार, मुक्तसैनिक वसाहत, ऋणमुत्तेश्वर, रंकाळा स्टॅण्ड, गंगावेश, शिंगोशी मार्केट, महाद्वार रोड, सदर बझार आदी रोडवर मोकाट जनावरे उभी असतात. तर काही ठिकाणी ठिय्या मारलेला असतो. याबाबत महापालिकेकडून योग्य ती कारवाई होत नसल्याने दिसून येत आहे. शहरात गेल्या काही दिवसात अनेक अपघातही झाले आहेत. महापालिका प्रशासन या मोकाट जनावरांना पकडून मालकांवर तात्पुरती कारवाई करते, नंतर पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती होत असल्याचे वास्तव आहे.








