विविध ठिकाणी वाहतुकीला अडथळा : कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याची मागणी
बेळगाव : शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न काही केल्या सुटताना दिसत नाही. मोकाट जनावरांमुळे मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडीमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. महापालिकेकडून कारवाई होते. परंतु, ती तात्पुरत्या स्वरुपात असल्याने मोकाट जनावरांचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याची मागणी केली जात आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील धर्मवीर संभाजी चौकात नेहमीच मोकाट जनावरांचा वावर असतो. सध्या पावसाचे दिवस असल्याने मोकाट जनावरे आसरा घेण्यासाठी बसथांब्यावर जात आहेत. परंतु, त्या ठिकाणी शेण पडत असल्याने बससाठी वाट पाहात असलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच बसथांब्यांवर दुर्गंधीही पसरत आहे. रस्त्याच्या मध्येच मोकाट जनावरे बसत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. गोवा तसेच चंदगड व परिसरातील नागरिक खरेदीसाठी धर्मवीर संभाजी चौकातून शहरात प्रवेश करतात. परंतु, या मोकाट जनावरांचा त्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे एकतर ही मोकाट जनावरे गोशाळेत पाठवावीत अन्यथा मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
कॅन्टोन्मेंट प्रशासनाचे दुर्लक्ष
सर्वाधिक मोकाट जनावरे ही कॅम्प परिसरात आहेत. काही पशुपालक आपली जनावरे सकाळी सोडल्यानंतर थेट संध्याकाळीच घराकडे आणतात. दिवसभर ही जनावरे कॅम्प, धर्मवीर संभाजी चौक, संचयनी सर्कल येथील कचरा, भाजीपाला खात फिरत असतात. मोकाट जनावरांवर कारवाई करण्याकडे कॅन्टोन्मेंट प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या चुकीमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.









