गावात नाही गल्ली ना चौक
सर्वसाधारणपणे गावांमध्ये चौक आणि कट्टा असल्याचे दिसून येते. छोटय़ा-छोटय़ा गल्ल्या, अरुंद रस्ते असतात. परंतु मध्यप्रदेशच्या मालवा जिल्हय़ात एक असे गाव आहे, जेथे कुठलाच चौक नाही तसेच कुठली गल्ली देखील नाही. गावात जर काही आहे ते म्हणजे एक रस्ता. या गावाचे नाव रुपारेल आहे.
या गावात घर, मंदिर, शाळा, दुकानांपासून स्मशानभूमी सर्वकाही आहे, परंतु या ठिकाणी कुठलीही गल्ली नाही. केवळ एका मार्गावर हे सर्वकाही तुम्हाला दिसून येईल. रुपारेल गाव पूर्णपणे एका रस्त्याच्या कडेला वसलेले आहे.
रस्त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला ही घरे बांधलेली आहेत. या गावात हिंदू तसेच मुस्लिमांपासून सर्व जातीचे लोक सौहार्दाने राहतात. एक किलोमीटरपर्यंत पसरलेल्या या गावाची लोकसंख्या 600 हून अधिक आहे. पूर्वी हे गाव असे नव्हते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 12 वर्षांपूर्वी धरणाच्या निर्मितीनंतर पूर्ण गाव बुडित क्षेत्राखाली आले. 2012 नंतर सरकारने नव्याने हे गाव वसविले आहे. परंतु हे गाव वसविताना यात कुठेही गल्ली, चौक इत्यादीची निर्मिती करण्यात आली नव्हती. याचमुळे या गावाला आता वेगळी ओळख मिळाली आहे. लोक याला एक रोडवाला गाव देखील म्हणत आहेत.
रुपारेल गाव नव्याने वसविण्यात आल्याने यात अद्याप अनेक सुविधांचा विकास व्हायचा आहे. परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूलाच हे गाव विस्तारत चालले आहे. यामुळे गावाचा आकार कायम राहिला आहे.