गळा अन् हात बांधलेला 2300 वर्षे जुना सांगाडा : मानवी बळीचा पुरावा
पेरूमध्ये पुरातत्वतज्ञांना एका प्राचीन मंदिरानजीक 2300 वर्षे जुने 14 हून अधिक सांगाडे मिळाले आहेत. या शोधामुळे मानवी बळीचे संकेत मिळाले आहेत. हा शोध 2024 मध्ये सुरू झाला होता, जो अजून जारी आहे. थडग्यांमध्ये काही विशिष्ट अन् अजब गोष्टी आढळून आल्या आहेत.
नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सॅन मार्कोसचे प्राध्यापक हेन्री हँटालियन यांच्या नेतृत्वात शोध करणाऱ्या पुरातत्वतज्ञांच्या टीमने हे सांगाडे पुएमापे मंदिर परिसरानजीक मिळाल्याचे सांगितले. हे मंदिर सुमारे 3000 वर्षे जुने आहे, तर सांगाडे 2300 वर्षांपूर्वीचे आहेत. या सांगाड्यांना थडग्यांमध्ये अजब पद्धतीने ठेवण्यात आले होते. त्यांचे चेहरे जमिनीच्या दिशेने होते. हा प्रकार एंडियन प्राचीन इतिहासात असामान्य असल्याचे टँटालियन यांनी सांगितले.
अनेक सांगाड्यांची कवटी फुटलेली होती, काहींच्या गळ्यात दोरखंड होते आणि हात बांधलेल्या अवस्थेत होते, यातून हे लोक बळीचे शिकार ठरल्याचा अनुमान आहे. या सांगाड्यांसोबत कुठलीही सामग्री नव्हती. हा प्रकार देखील असामान्य आहे, सर्वसाधारणपणे प्राचीन दफनमध्ये सोने-चांदीची भांडी इत्यादी सामग्री मिळते, परंतु येथे असे काहीच नव्हते असे त्यांनी सांगितले.
पुएमापे मंदिर उत्तर-पश्चिम पेरूच्या ला लिबेर्ताद क्षेत्रात समुद्रकिनाऱ्यानजीक आहे. माचू पिचू आणि नाज्का लाइन्स यासारख्या पुरातत्व स्थळांपैकी हे एक आहे. मंदिर कपिस्निक संस्कृतीचे असून ती इंका साम्राज्याच्या 1 हजार वर्षांपूर्वी बहरली होती. हे लोक या प्राचीन पूजास्थळासाठी बळीच्या स्वरुपात वापरले गेले असावेत असे टँटालियन यांचे सांगणे आहे. आता या सांगाड्यांचे डीएनए टेस्टिंग आणि अन्य अध्ययन करण्यात येत आहेत. मंदिर परिसरात मिळालेली मातीची भांडी, प्राणी आणि रोपांच्या अवशेषांचेही विश्लेषण केले जात आहे.









