वैज्ञानिकांसाठी देखील रहस्य
रशियात एक असे रहस्यमय गाव आहे, जे वैज्ञानिकांसाठी कोडं ठरले आहे. हे गाव एम-ट्रायंगलच्या नावाने ओळखले जाते. राजधानी मॉस्कोपासून सुमारे 600 मैल अंतरावर उराल पर्वतरांगेनजीक ‘मोल्योब्का’ नावाचे हे गाव आहे. एम-ट्रायंगलचा अर्थ मोल्योब्का ट्रायंगल आहे. हे रशियाच्या सर्वात रहस्यमय भागांपैकी एक आहे. एकेकाळी हे स्थान तेथील स्थानिक मानसी लोकांसाठी पवित्र मानले जात होते. परंतु आता हे ठिकाण रहस्यमय ठरले आहे.
या रहस्यमय ठिकाणाला पर्म क्षेत्राचा एम-ट्रायंगल किंवा ‘पर्म विषम झोन’ही म्हटले जाते, जे 70 चौरस मैलामध्ये फैलावलेले आहे. 1980 मध्ये हा भाग रहस्यमय आवाज ऐकू येऊ लागल्यावर चर्चेत आला. तेथे अचानक आवाज ऐकू येऊ लागले. संशोधकांनी तेथील आवाज रिकॉर्ड केले आहेत. एखादे भरधाव वाहन जवळून गेल्यासारखा हा आवाज असतो. आश्चर्याची बाब म्हणजे येथून सर्वात जवळचा रस्ता सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आहे. अखेर हा आवाज कोठून येतो, याचे रहस्य अद्याप कायम आहे.
एम-ट्रायंगलमध्ये असामान्य घटना घडतात, ढगांमधून पृथ्वीवर प्रकाशाचा एक झोत येत असल्याचे तेथे जाणवते. तर घनदाट जंगलांमध्ये अचानक विचित्र पारदर्शक गोष्टी दिसू लागतात आणि आकाशात अजब चिन्ह किंवा अक्षर दिसू लागते. या ठिकाणी एखाद्या माणसाने वास्तव्य केल्यास तो कुशाग्र होतो असे बोलले जाते. पर्म झोनमध्ये येणारा गंभीर व्यक्ती आपोआप बरा होत असल्याचेही बोलले जाते.
सर्वात चकित करणारी गोष्ट म्हणजे येथे अनेक कंपन्यांचे मोबाइल नेटवर्क आहे, तरीही येथे फोन काम करत नाहीत. याचबरोबर येथे एक रहस्यमय मातीचा ढिगारा आहे, ज्यावर चढल्यास तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात फोन कॉल करू शकता, परंतु त्यावरून उतरल्यास कॉल कट होतो. या रहस्यमय ढिगाऱ्याला ‘कॉल बॉक्स’ म्हटले जाते.









