कोल्हापुरात विचित्र स्थिती: मुबलक पाऊस असणाऱ्या जिल्ह्यातच पाण्यासाठी वणवण: टँकरने पाणीपुरवठ्याचे पाप कोणाचे? लहान-मोठी 15 धरणे, 85 टीएमसी क्षमता असताना पाणीबाणी होतेच कशी?
विनोद सावंत कोल्हापूर
‘
दरवर्षी पूर, दरवर्षीच पाणी टंचाई’ अशी विचित्र स्थित कोल्हापूर शहराची झाली आहे. मुबलक पाऊस असणाऱ्या जिल्ह्यातच टँकरने पाणी घेण्याची वेळ येणे हे दुर्देवी आहे. लहान-मोठी प्रमुख 15 धरणे, 85 टीएमसी इतकी पाणी साठविण्याची क्षमता असतानाही शहरात पाणीबाणी स्थिती येतेच कशी? पाटबंधारे विभाग आणि महापालिका प्रशासन यांचे नेमके पाण्याच्या नियोजनाचे गणित चुकते कुठे असा सवाल उपस्थित होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाऊस होतो. किंबहुना काहीवेळा अतिवृष्टीमुळे महापुराचाही सामना करावा लागतो. एकूणच दरवर्षी पंचगंगा नदीला पूर ठरलेला असतो. काही अपवाद वगळता येथे दुष्काळाची स्थिती फारसी होत नाही. यामुळेच जुलै-ऑगस्टमध्येच येथील नदी, धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असतात. यामुळेच पावसाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हा सधन मानला जातो.
कोल्हापूर शहरातील लोकांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची चणचण भासू नये म्हणूनच राजर्षी शाहू महाराज यांनी राधानगरी येथे धरणाची उभारणी केली. परंतू त्यांच्यानंतर आजपर्यंत राजकर्त्यांनी कोल्हापुरातील वाढत्या पावसाचा तसेच वाढत्या लोकसंख्येचा विचार करून जलसिंचनामध्ये कोणतीही ठोस पावले उचलेली दिसत नाहीत. महापूर अथवा पूरावेळी लाखो एमएमएलडी पाणी वाहून जाते. या पाण्याचा वापर केल्यास मे-जून मध्ये उपसाबंदी करण्याची वेळ येणार नाही. मात्र, प्रशासनाकडून असे होत नाही. तसेच महापालिकेचा हलगर्जीपणाही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्यास कारणीभूत ठरत आहे. 50 वर्षापूर्वीची उपसा यंत्रणा आणि गळक्या पाईपलाईनमुळे शहरातील पाण्याचा बट्याबोळ उडाला आहे. वेळीच यावर उपाययोजना केल्या नाहीत. यात आता धरण-नदीत पाणीसाठा कमी असल्याने आणखीन भर पडली. त्यामुळेच नागरिकांवर पाणी-पाणी करण्याची वेळ आली आहे.
जलसिंचनात अपयशी
जिल्ह्यात प्रमुख 15 लहान-मोठी धरणे असून 85 टीएमसी पाणी साठविण्याची क्षमता आहे. तरीही शहरात मे आणि जूनमध्ये उपसाबंदी, शहरात पाणीबाणी होते. मनपावर दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची नामुष्की येते. प्रमाणापेक्षा जास्त पाऊस होऊनही अशी स्थिती येते म्हणजे जलसिंचनात प्रशासन कुठे तरी कमी पडत आहे.
पूर येऊनही पाण्यासाठी वणवण
कोल्हापुरात 2019 मध्ये महापूर, 2020 मध्ये पूर, 2021 मध्ये पुन्हा महापूर आणि 2022 मध्ये तीन वेळा पंचगंगा नदी पात्राबाहेर जाऊन पूर आला होता. तरीही धरण, नदीतील पाण्याची पातळी कमी कशी होते.
मनपा, पाटबंधारेच्या समन्वययाचा अभाव
शिंगणापूर येथील उपसा केंद्राजवळ मनपा आणि पाटबंधारेचे कर्मचारी रोज पाण्याच्या पातळीची नोंद ठेवत होते. पाणी पातळी कमी होत असल्यास मनपा कर्मचारी तत्काळ पाटबंधारे विभागाला कळवून धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जात होता. आता असे होताना दिसून येत नाही.
धरण, नदीतील गाळ काढला नसल्याचे परिणाम
कोल्हापुरात 2021 मध्ये महापूर आला होता. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी येथील धरणातील व नदीतील गाळ काढण्याचे आदेश दिले होते. परंतू आजतागयात गाळ काढलेला नाही. त्यामुळे धरण, नदीतील पाणी क्षमता कमी झाली आहे. पुराचे पाणी वापराविना वाहून जात आहे.
काय केले पाहिजे
-नदी, धरणातील गाळ काढून पाणी साठविण्याची क्षमता वाढविणे.
-अतिवृष्टी असणाऱ्या परिसरात नवीन धरणाची उभारणी करणे.
-सध्या असणाऱ्या धरणाची क्षमता वाढविणे.
-पूराच्या पाण्याचा वापर होईल, अशी यंत्रणा उभारणे.
-रेन वॉटर हार्वोस्टिंग बंधनकारक करणे.
प्रकल्प पाणीसाठा (टीएमसी) सध्याचा पाणीसाठा (टीएमसी)
राधानगरी 8.361 1.91
काळम्मावाडी 25.391 11.97
तुळशी 3.471 1.09
वारणा 34.399 11.97
कासारी 2.7 74 1.85
कडवी 2.516 0.56
कुंभी 2.715 0.79
पाटगांव 3.716 0.99
चिकोत्रा 1.522 0.84
चित्री 1.886 0.46
जंगमहट्टी 1.223 0.36
घटप्रभा 1.560 0.32
जांबरे 0.820 0.62
आंबेओहोळ 1.240 0.19
कोदे 0.214 0.44









