क्रूजवरून बर्म्युडा ट्राएंगलचा प्रवास करा, परत न आल्यास पैसे परत करू
ब्रिटनच्या एका कंपनीने लोकांना अत्यंत अजब ऑफर दिली आहे. आजपर्यंत बर्म्युडा ट्राएंगलनजीक अनेक विमाने आणि जहाजं बेपत्ता झाली आहेत, परंतु आम्ही तयार केलेली क्रूज बर्म्युडा ट्राएंगल येथून परत येण्याची हमी आहे. ही क्रूज बर्म्युडा ट्राएंगल येथून न परतल्यास आम्ही प्रवाशांना त्यांची पूर्ण रक्कम परत करू असे कंपनीने म्हटले आहे.
बर्म्युडा ट्राएंगल अटलांटिक महासागरात 5 लाख चौरस किलोमीटरचा एक हिस्सा आहे. हे क्षेत्र त्रिकोणी आकाराचे आहे. मागील 100 वर्षांमध्ये 75 विमाने आणि 100 हून अधिक छोटी-मोठी जहाजे या क्षेत्रातून बेपत्ता झाली आहेत. या घटनांमध्ये 1 हजारांहून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. याचमुळे याला डेव्हिल ट्राएंगल या नावाने देखील ओळखले जाते.

1.5 लाख रुपयांचा खर्च
नॉर्वेजियन प्राइमातून प्रवास करण्यासाठी लोकांना 1.5 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. या पॅकेजमध्ये एक व्यक्ती 5 दिवस आणि 5 रात्रींचा प्रवास करून सर्वात धोकादायक आणि बदनाम ट्राएंगलवर पोहोचू शकणार आहे. या प्रवासावर जाणाऱया लोकांनी निर्धास्त होऊन क्रूज प्रवास करावा, कारण हे क्रूज 100 टक्के परत येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

पुढील वर्षी रवाना होणार
अन्य जहाजांप्रमाणे आमची क्रूज बेपत्ता झाल्यास प्रवाशांकडून घेण्यात आलेली पूर्ण रक्कम परत करण्यात येणार आहे. या प्रवासात लोक काचेच्या एका नौकेतून सैर करू शकतील, त्यांना चीफ गेस्ट निक पोप आणि निक रेडफर्न यांना प्रश्न विचारण्याची संधीही देण्यात येणार आहे. पुढील वर्षी मार्चमध्ये ही क्रूज बर्म्युडा ट्राएंगलसाठी रवाना होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्या आले.
बर्म्युडा ट्राएंगलचे रहस्य
या ट्राएंगलच्या ठिकाणी विमाने आणि जहाजं गायब होण्यामागील ठोस कारण अद्याप समजू शकलेले नाही. अनेक लोक या घटनांसाठी परग्रहवासीय आणि वाईट शक्तींना जबाबदार मानतात. बर्म्युडा ट्राएंगल मानवी चुकांचेच फळ असल्याचेही बोलले जाते.









