जेव्हा तुम्ही रस्त्यावरून चालत असाल तेव्हा रस्त्यांवरील रेषा निश्चितच पाहिल्या असतील. या रेषा वाहतुकीचे व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने काढलेल्या असतात. कुठे पिवळ्या रंगाची रेषा असते तर कुठे पांढऱ्या रंगाची रेषा असते. काही ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या डॉटेड रेषा असतात. परंतु कधी रस्त्यांवर तुम्ही आडव्या-तिडव्या रेषा पाहिल्या आहेत का? फ्रान्सच्या एका शहरात असा रस्ता आहे, ज्यावर आडव्या-तिडव्या रेषा तयार करण्यात आल्या आहेत. ही कामगारांची चूक नसून हे विशेष कारणाने हे कृत्य करण्यात आले आहे.

पश्चिम फ्रान्सच्या बॉन भागात असा रस्ता आहे, ज्यावर आडव्या-तिडव्या रेषा तयार करण्यात आल्या आहेत. बॉन हा भाग एंगर्स शहरानजीक असून येथील लोकसंख्या अत्यंत कमी आहे. येथे सुमारे 1700 लोक राहतात. बॉनमधून दोन प्रमुख रस्ते डी74 आणि डी84 जातात. या रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने येथे वाहतूक कोंडी होत असते. याचबरोबर दुचाकीस्वार अन् कारचालक सुमारे 100 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहने चालवत असतात. परंतु प्रत्यक्षात या रस्त्यावर वाहनांचा वेग 30 किलोमीटर प्रतितास इतका असणे अपेक्षित आहे.
वाहनांच्या अत्याधिक वेगाच्या समस्येपासून मुक्ती मिळविण्यासाठी प्रशासनाने येथील रस्त्यांवर आडव्या-तिडव्या रेषा तयार करविल्या आहेत. यामुळे यावरून वाहन चालविताना आपसूकच त्यांचा वेग कमी होत आहे. संबंधित रस्त्यांवर अनेक आडव्या-तिडव्या रेषा असल्याचे पाहून वाहनचालक वेग कमी करत अधिक लक्षपूर्वक तेथून प्रवास करत आहेत. या रेषा तयार करण्याचा लाभ प्रशासनाला स्पष्टपणे दिसून येत आहे.
परंतु येथे प्रशासनाने अखेर पारंपरिक पद्धती का स्वीकारल्या नाहीत असा प्रश्न अनेक लोकांनी उपस्थित केला आहे. चौक तयार करणे किंवा ट्रॅफिक सिग्नलद्वारे वेगावर नियंत्रण मिळविले जाऊ शकते होते असे त्यांचे सांगणे आहे. लॉयर ऑथियनचे उपमहापौर आणि स्थानिक विकासाचे प्रभारी ग्रेगोइरे जॉनॉल्ट यांच्यानुसार रस्त्यांवरील जाणूनबुजून भ्रमित करणाऱ्या चिन्हांमुळे स्थितीत सुधारणा झाली आहे. डाटानुसार वाहनांच्या वेगात घट झाली आहे. परंतु हे परिणाम तात्पुरते स्वरुपाचे असून वाहनचालकांना यामागील सत्य समजल्यावर ते पुन्हा अत्याधिक वेगाकडे परततील, असे स्थानिक समुदायातील एका वर्गाचे मानणे आहे.









