काही प्रेक्षकांना होत आहे उलटी
अमेरिकेत सध्या टॅरीफायर 2 हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे ठरत आहे. परंतु हा चित्रपट पाहण्यासाठी लोक गर्दीही करत आहेत. हा चित्रपट केवळ 700 चित्रपटगृहांमध्ये प्रारंभी प्रदर्शित करण्यात आला होता. परंतु प्रेक्षकांची गर्दी वाढू लागल्याने याचे शो वाढविण्यात आले आहेत. चित्रपटात हॉररसह रक्तपात अत्यंत विद्रूप पद्धतीने दर्शविण्यात आल्याने लोकांना ते सहन होत नसल्याची स्थिती आहे. सोशल मीडियावर लोकांकडून चित्रपटासंबंधीचे अनुभव शेअर करण्यात येत आहेत. या चित्रपटातील दृश्यं पाहून अनेक लोक चित्रपटगृहातच उलटी करत आहेत, तर कुणाच्या शरीराला कंप सुटू लागला आहे. अनेक जण चित्रपट बघणे थांबवून बाथरुमला जता आहेत. एका व्यक्तीने तर हॉलमधून बाहेर पडताच रुग्णालयात फोन करून स्वतःसाठी रुग्णवाहिका मागविली होती.

चित्रपटाच्या निर्मात्याने ट्विटरवर यातील हॉरर आणि रक्तपाताबद्दल इशारा जरी केला आहे. 2016 मध्ये प्रदर्शित टेरीफायर या चित्रपटाचा टेरीफायर 2 हा सीक्वेल आहे. चित्रपटात एका जोकरच्या वेशातील व्यक्तीची कहाणी दर्शविण्यात आली असून तो शहराच्या छोटय़ा भागात एका महिला आणि मुलाचा शोध घेत असतो. या दोघांचा शोध न लागल्याने तो तेथे निर्दयीपणे हत्या करू लागतो. जोकरच्या वेशातील व्यक्तिरेखेचे नाव ‘आर्ट’ आहे. डेव्हिड होवर्ड थॉर्नटनने ही भूमिका साकारली आहे.









