कडोली :
येथील मराठी साहित्य संघ आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यावतीने बुधवारी कथाकथन स्पर्धा उत्साहात पार पडली. साहित्य संघाच्या कार्यालयात या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून कडोलीचे अभियंता व कॉन्ट्रॅक्टर श्रीनिवास कल्लाप्पा कालकुंद्रीकर आणि आदर्श शिक्षक देवानंद पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष भरमाणी डोंगरे होते.
रोहिणी होनगेकर यांच्या स्वागतगीतानंतर भरमाणी डोंगरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्रीनिवास कालकुंद्रीकर यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे तर देवानंद पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. प्रमुख पाहुणे तसेच परीक्षक प्रा. मायाप्पा पाटील आणि किरण होनगेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. कालकुंद्रीकर व पाटील यांनी मराठी साहित्य संघाच्या कार्याचे कौतुक केले. गेली 40 वर्षे अनेक स्पर्धा घेऊन मुलांच्या कलागुणांना वाव दिल्याचा उल्लेख त्यांनी केला.
बसवंत शहापूरकर यांनी स्पर्धेचे नियम व अटी यांची माहिती दिली. ही स्पर्धा शालेय गट (दहावीपर्यंत) आणि शालेय गट अशा दोन गटात घेण्यात आली. त्यामध्ये कथाकारांनी विविध लेखकांच्या कथा सांगत रसिकांना खिळवून ठेवले. टाळ्यांच्या गजरात रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. स्पर्धेनंतर परीक्षक प्रा. मायाप्पा पाटील यांनी स्पर्धेचा आढावा घेत मनोगत मांडले. कथा कशी निवडावी, ती कशी सांगावी, पाठांतर, हावभाव याबाबत मार्गदर्शन केले. अनिऊद्ध पाटील यांनी सूत्रसंचालन केले. बाबुराव गौंडवाडकर यांनी आभार मानले. स्पर्धेचे बक्षीस वितरण दि. 19 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या 40 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनात होणार आहे.









