महामार्गावर 3 कोटींची लूट : हपापाचा माल गपापामुळे पोलिसांनाही लागल्या धापा, पंधरा दिवसांपासून पोलीस गुंतलेत तपासात
बेळगाव : एखाद्या गुन्हेगारी प्रकरणाचा तपास करायचाच नसेल तर पोलीस अनेक कारणे देत टाळाटाळ करतात. जर पोलिसांनी एखाद्या प्रकरणाचा छडा लावण्याचे ठरविले तर अनेक अडथळे पार करून आणि हात धुवून प्रकरणाच्या मागे लागतात. केवळ ते प्रकरण कोणाचे आहे? त्यासाठी किती वेळ द्यायचा? त्यामुळे होणारे फायदे काय आहेत? हे स्पष्ट झाले पाहिजे. त्यानंतरच अधिकारी कामाला लागतात. सध्या बेळगाव पोलिसांनी अशाच एका राजकीय अभिनिवेश असलेल्या प्रकरणाचा ध्यास घेऊन त्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा चंगच बांधला आहे. सर्वसामान्यांच्या घरात चोरी झाली तर ते घर कोणत्या पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात येते? घरातील मंडळींच्या चुकांकडे बोट दाखवून त्यांनाच अपराधीपणाच्या खाईत लोटले जाते. दागिने व किमती वस्तू चोरीस गेल्यानंतर त्यांच्या खरेदीच्या पावत्या मागितल्या जातात. ज्यांच्या घरी चोरी झालेली असते त्यांना पोलीसस्थानकाचे शंभर हेलपाटे मारायला लावून ‘भीक नको पण कुत्रा आवर’ म्हणण्याची वेळ आणली जाते. प्रत्येकवेळी ‘तपास सुरू आहे’ हे पठडीतील उत्तर देऊन त्यांची बोळवण केली जाते.
गेल्या पंधरा दिवसांपासून बेळगाव पोलीस या कानाचे त्या कानाला कळू न देता एका दरोड्याच्या तपासात गुंतले आहेत. यासाठी संकेश्वर, निपाणी, इचलकरंजी, गडहिंग्लज आदी शहरे पालथी घातली जात आहेत. दहा ते बारा जणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली आहे. यापैकी काही जणांनी दरोड्यातील सहभागाची कबुलीही दिली आहे. त्यांच्याकडून लुटीतील रक्कम वसूल करण्याचे काम इमानेइतबारे केले जात आहे. कर्नाटक विधानसभेसाठी 10 मे 2023 रोजी मतदान झाले. त्याआधी घडलेली ही घटना आहे. कारमधून गडहिंग्लजहून अडीच ते तीन कोटी रुपये बेळगावला आणले जात होते. याची माहिती मिळाल्यानंतर बेळगाव, संकेश्वर, निपाणी, इचलकरंजी, गडहिंग्लज येथील दहा ते बारा जण एकत्र आले. त्यांनी ही रक्कम लुटण्याचा निर्णय घेतला. पैसे घेऊन येणाऱ्या वाहनावर पाळत ठेवण्यात आली. पैसे आणणारे वाहन नजरेस पडताच त्याचा पाठलाग सुरू करण्यात आला. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील संकेश्वरजवळ या वाहनाला दुसऱ्या वाहनाची धडक मारण्यात आली. अपघातानंतर वादावादीचा प्रसंगही घडला. या दरम्यान कारमधील पैशांची बॅग पळविण्यात आली. त्यावेळी या प्रकरणाची कोणत्याच पोलीस स्थानकात नोंद झाली नाही. साधी चर्चाही झाली नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक या प्रकरणाच्या तपासाने उचल खाल्ली आहे.
वृत्तपत्रे अथवा समाजमाध्यमांनाही सुगावा नाही
27 जूनदरम्यान इचलकरंजी येथील एक गुंड व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेऊन त्यांना बेळगावला आणण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली. याच काळात बेळगाव येथील तीन तरुणांनाही ताब्यात घेण्यात आले. गोकाक, हुक्केरी, निपाणी येथील संशयितांना ताब्यात घेण्यात आले. एकूण दहा ते बारा जणांच्या चौकशीनंतर ‘होय, हा दरोडा आम्हीच घातला’ अशी कबुली गुन्हेगारांनी दिली. दरोड्यानंतर बारा जणांनी वाटून घेतलेले पैसे परत मिळविण्याचे काम सुरू आहे. या सर्व हालचालींचा वृत्तपत्रे अथवा समाजमाध्यमांना पोलिसांनी सुगावा लागू दिला नाही.
उधळलेला पैसा कसा वसूल करायचा?
लुटीतील रकमेचा वापर प्रत्येकाने वेगवेगळ्या कारणासाठी केला आहे. कोणी घर बांधकाम सुरू केले तर आणखी कोणी नवी जीप गाडी खरेदी केली. जुगाराचा नाद असणाऱ्यांनी सावगाव ते बेळगुंदी रोड परिसरात असलेल्या जुगारी अ•dयांवर व गोव्यातील कॅसिनोमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा उधळून ‘जीवाचा गोवा’ केला. आता जुगारी अ•dयावर उधळलेला पैसा कसा वसूल करायचा? हा प्रश्न राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी लूट प्रकरणाच्या मागे हात धुवून पडलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना पडला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोलीस यंत्रणा पूर्णपणे या प्रकरणाच्या तपासात गुंतली असली तरी या प्रकरणाची वाच्यता कोठेच करण्यात आली नाही. पाचशे-हजाराच्या चोरीचा गवगवा केला जातो, मात्र अडीच ते तीन कोटींच्या लुटमारीच्या प्रकरणाची एक ओळही माहिती दिली जात नाही, यामागील नेमके गौडबंगाल काय? पोलीस खाते इतके कोणाचे हितसंबंध जपत आहेत? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
बेळगावला नवे आयुक्त कधी?
पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची बदली होऊन 20 दिवस झाले. सरकारने बेळगावला अद्याप नव्या पोलीस आयुक्तांची निवड केलेली नाही. 28 जूनपासून बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विकाशकुमार यांच्याकडे पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त भार आहे. बेळगावला स्वतंत्र आयुक्त कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस दलात प्रचंड ढिलाई आली असून साहजिकच गैरधंदे वाढले आहेत. गैरधंदेचालक व पोलीस अधिकाऱ्यांचे साटेलोटे बनले आहेत. या परिस्थितीत बदल करण्यासाठी कडक आयुक्तांची गरज आहे.









