10 ऑक्टोबरपर्यंत वेगवान वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
रत्नागिरी प्रतिनिधी
चीनच्या समुद्रात निर्माण झालेल्या ‘नोरू’ चक्रीवादळाचा परिणाम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र प्रभावित झाल्याने त्याचे पडसाद राज्यभरासह कोकण किनारपट्टीवर उमटले आहेत. गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसाने वेगवान वाऱ्यासह रत्नागिरीला चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील मासेमारी ठप्प तर खरीपाच्या शेतीचेही नुकसान होऊ लागले आहे. जिल्ह्यात 10 ऑक्टोबरपर्यंत काही ठिकाणी वेगवान वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मान्सूनचा परतीकडे प्रवास सुरू असतानाच आठवडाभराच्या ब्रेकनंतर पुन्हा दमदार पावसाला प्रारंभ झाला आहे. दसऱ्याच्या मुहुर्तावर या पावसाने पुन्हा जोर धरलेला दिसत आहे. गेल्या 2 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात या पावसाने बस्तान बसवलेले आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर, चिपळूण, संगमेश्वर या भागात या पावसाचा जोर अधिक पहायला मिळत आहे. शुक्रवारीही सकाळपासून अगदी दुपारपर्यंत या पावसाने झोडपून काढले. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालेली दिसत आहे.
बदलत्या हवामानाचा परिणाम परतीच्या पावसाचा मुक्काम लांबल्याने कोकण किनारपट्टी भागात रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी 30-40 प्रति तास वेगाने वारे वाहण्यासह व विजेच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील मासेमारीला मोठा फटका बसला आहे. खराब हवामानामुळे मासेमारी ठप्प झाली आहे. नवरात्रोत्सवादरम्यान वातावरण चांगले होते. त्यामुळे मच्छीमारांना चांगली मासळी मिळू लागली होती. उपरत्या वाऱ्यांमुळे मासळी बदलत्या प्रवाहांमुळे समुद्राकडून किनाऱ्याकडे येऊ लागली होती. परिणामी गेले आठवडाभर सर्वच मच्छीमारांनी मासळी पकडण्यासाठी त्यावर चांगल्याच उड्या मारल्या. प्रवाहांमुळे विविध प्रकारची मासळी एकाच ठिकाणी सापडत होती. नवरात्रीच्या कालावधीत प्रवाहांची दिशा ठरलेली असल्याने या कालावधीत 9 प्रकारचे मासे मच्छीमारांच्या जाळयात सापडतात. याचा फायदा ट्रॉलस्, पर्ससीननेटने मासेमारी करणाऱ्यांना झाला होता.
दरम्यान मच्छीमारांना 50 ते 100 टब (32 किलोचा एक टब) मासे मिळत होते. त्यात फिशमिलला दिला जाणारा बांगडी मासा मोठ्या प्रमाणात सापडत होता. मात्र त्याचा दर 16 रुपये किलो इतकाच दिला जात असल्याने मच्छीमारात नाराजी दिसून आली. हा दर 18 ते 20 रुपये मिळणे अपेक्षित आहे. ही मासेमारी हंगामाला चांगली सुरूवात असतानाच या पावसाच्या बदललेल्या वातावरणाने त्यासमोर पुन्हा विघ्न उभे ठाकले आहे. यंदाच्या हंगामात थोड्या-थोड्या कालावधीत वादळसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याने मच्छीमारीत अडथळा निर्माण होत आहे. मागील आठवडाभरापूर्वी खोल समुद्रात वादळ होते. समुद्रही खवळलेला होता. ते सरल्यानंतर आता परतीच्या पावसाला सुरूवात झाली. किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेगही वाढला आहे.
भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबईकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार, 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी 30-40 प्रति तास वेगाने वारे वाहण्यासह व विजेच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरी जनेतेने सावधनता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.









