सनरायझर्स हैदाबादला सुरुवातीच्या धडाक्यानंतर आलेली मरगळ झटकून टाकता आलीय ती प्रामुख्यानं तुफानी सलामवीर अभिषेक शर्मामुळं…त्यानं पंजाब किंग्सच्या गोलंदाजांची अक्षरश: धुलाई केली. मध्यंतरी फॉर्म हरवल्यागत दिसणाऱ्या अभिषेकला सूर सापडल्यानंतर काय होतं त्याचा हा उत्कृष्ट नमुना अन् साऱ्या प्रतिस्पर्धी संघांसाठी धोक्याचा इशारा…पंजाबच्या या युवा खेळाडूनं ‘आयपीएल’मध्येच नव्हे, तर भारतीय ‘टी-20’ संघातून खेळतानाही आपल्या बॅटचा इंगा अशाच पद्धतीनं दाखविलाय..
दृष्य पहिलं : मुंबईचा वानखेडे स्टेडियम आणि भारताची इंग्लंडविरुद्धची पाचवी टी-20 लढत…पंजाबचा 24 वर्षीय डावखुरा फलंदाज अभिषेक शर्मानं केवळ 54 चेंडूंत सात चौकार आणि तब्बल 13 षटकारांच्या साहाय्यानं 135 धावा नोंदवून इंग्लिश गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली अन् मुंबईकरांना जाम खूश केलं…भारतीयानं एखाद्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात नोंदविलेली ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या, तर त्याचं या स्वरुपाच्या क्रिकेटमधील दुसरं शतक (त्यासाठी पुरेसे ठरले 37 चेंडू)…भारतानं तो सामना जिंकला 150 धावांनी. टी-20 आंतरराष्ट्रीय लढतींतील धावांचा विचार केल्यास आपला हा दुसऱ्या क्रमांकाचा विजय. त्या दिवशी अभिषेकनं दर्शन घडविलं ते हात नि डोळे यांच्यातील अप्रतिम समन्वयाचं…
दृष्य दुसरं : हैदराबादचा राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम…सलग चार पराभवांना सामोरं गेलेल्या सनरायझर्स हैदराबादनं परिस्थिती फिरविली ती त्याच अभिषेक शर्माच्या फलंदाजीच्या जोरावर…त्यानं 55 चेंडूंत 256.36 च्या ‘स्ट्राईक रेट’नं चक्क 14 चौकार व 10 षटकारांची बरसात करत 141 धावांचा रतीब ओतला…पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरनं वापर केला तो तब्बल आठ गोलंदाजांचा, परंतु त्या वादळाला कुणीच रोखू शकलं नाही. चेंडूंचा टप्पा नेमका टाकायचा तरी कुठं तेच त्यांना कळेनासं झालं…
त्या दिवशी दोन्ही संघांनी एकूण 492 धावांचा पाऊस पाडला. पंजाब किंग्सची 6 बाद 245 ही इंडियन प्रीमियर लीगमधील एखाद्या संघानं नोंदविलेली दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या. पण ती देखील अभिषेक शर्माच्या झंझावातापुढं अपुरी पडली अन् सनरायझर्सनी धावफलकावर झळकविल्या त्या 2 बाद 247 धावा (यापूर्वी 26 एप्रिल, 2024 या दिवशी पंजाब किंग्सनं विजय खेचताना ‘केकेआर’बरोबरच्या लढतीत नोंद केली होती ती 2 बाद 262 धावांची)…श्रेयस अय्यरनं 36 चेंडूत काढलेल्या 82 धावा देखील अभिषेकच्या खेळीपुढं फिक्या पडल्या…
नेहमीप्रमाणं अभिषेक शर्मा व ऑस्ट्रेलियाच्या प्रचंड आक्रमक ट्रेव्हिस हेडनं केवळ 75 चेंडूंत चक्क 171 धावा फटकावल्यानंतर पंजाबचा आत्मविश्वासच गारद झाला असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाहीये. विशेष म्हणजे 37 चेंडूंत 9 चौकार नि 3 षटकारांच्या साहाय्यानं 66 धावा जमविणारा कागारुंचा फलंदाज सुद्धा आपल्या भारतीय सहकाऱ्याच्या आक्रमणापुढं झाकोळला…जेव्हा अभिषेक पॅव्हिलियनमध्ये परतला तेव्हा यजमान संघाला गरज होती ती 22 चेंडूंत फक्त 24 धावांची…
अभिषेक शर्माला यादरम्यान मिळाली ती तीन जीवदानं. स्टॉईनिसनं त्याचा झेल 4 धावांवर सोडला, तर यश ठाकूरनं 28 धावांवर पकडलेला झेल ‘नो बॉल’मुळं वाया गेला. त्यानंतर युजवेंद्र चाहलला स्वत:च्याच गोलंदाजीवर कठीण झेल पकडता आला नाही तेव्हा तो 56 धावांवर खेळत होता…अभिषेकला पहिल्या पाच डावांत काढता आल्या होत्या त्या फक्त 51 धावा (24, 6, 1, 2 व 18). कदाचित आत्मविश्वास नि दैवाची साथ यांच्या अभावी त्याच्यावर अपयशाला तोंड देण्याची पाळी आलेली असावी…पंजाब किंग्स.विरुद्ध ‘इंडियन प्रीमियर लीग’मधील पहिलंवहिलं शतक 40 चेंडूंत पूर्ण करणारा अभिषेक शर्मा सामन्यानंतर म्हणाला, ‘सकाळी उठल्यानंतर काही तरी लिहिण्याची मला सवय असून त्या दिवशी लिहिलं होतं की, मी जर यश मिळविलं, तर ते ‘ऑरेंज आर्मी’साठी असेल. दैवानं साथ दिली. मला सदोदित समर्थन देणाऱ्या प्रेक्षकांचेही प्रचंड आभार’…
अभिषेक शर्माच्या फटकेबाजीमुळं प्रत्येकाला आठवण झाली ती वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलची अन् न्यूझीलंडच्या मॅकलमची…‘मला ताप आला नव्हता असं मी सांगितल्यास तो खोटारडेपणा ठरेल. त्या दिवशी माझी प्रकृती चांगली नव्हती. पण युवराज सिंग व सूर्यकुमार यादवसारख्या व्यक्ती मला मार्गदर्शन करत असल्यानं मी सुदैवीच. ते माझ्या सतत संपर्कात होते आणि माझा आत्मविश्वास वाढविण्याचं काम त्यांनी केलं. प्रश्न होता फक्त एका डावाचा. त्यापूर्वीच्या लढतीत जे घडलं नव्हतं तो योग त्या दिवशी जुळून आला’, अभिषेक सांगतो…
अभिषेक शर्मानं काढलेल्या 141 धावा म्हणजे एखाद्या भारतीयाची ‘इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वोत्तम कामगिरी…आपल्या घरच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ‘ऑरेंज आर्मी’नं पंजाबविरुद्ध नोंदविलेला हा सलग आठवा विजय…अभिषेकनं दिल्ली कॅपिटल्समधून सनरायझर्स हैदराबादमध्ये प्रवेश केला तो 2019 सालच्या मोसमात. यंदा हैदराबादनं सहा खेळाडूंना संघात राखून ठेवलंय अन् त्यापैकी तो एक….अभिषेक शर्मा व ट्रेव्हिस हेडची जोडी म्हणजे प्रतिस्पर्ध्यांच्या दृष्टीनं प्रचंड घातक आव्हान. ती यशस्वी ठरल्यास हैदराबादला विजयापासून रोखणं कुठल्याही संघासाठी अशक्यच (त्यांना पंजाब किंग्सविरुद्धच्या त्या लढतीत डेव्हिड वॉर्नर अन् जॉन बेअरस्टो यांनी आरसीबीविरुद्ध 2019 साली नोंदविलेला 185 धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडणं मात्र शक्य झालं नाही)…‘आम्ही दोघांनी नेहमीच संघाच्या हिताचा विचार केलाय आणि हैदराबादला यशस्वी केलंय. त्यामुळं आम्हाला माहीत होतं की, जर सुरुवात चांगली झाली, तर संघाला रोखणं शक्य होणार नाहीये’, अभिषेकचे विजय मिळविल्यानंतरचे शब्द…
युवराज सिंगच्या क्रिकेटचा पाया घातला तो वडील योगराज सिंह यांनी. त्याचप्रमाणं आता युवराज अभिषेक शर्माला मार्गदर्शन करतोय. त्यानं भारतातील वेगळ्या स्टेडियममधील खेळपट्ट्यांवर खेळण्याच्या बाबतीत त्याला मदत केलीय. युवराजनं भारतीय प्रेक्षकांना विनंती केली होती ती सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धा व त्याच्या सुरुवातीच्या आयपीएल स्पर्धेनंतर जास्त अपेक्षा न बाळगण्याची…अभिषेक सांगतो की, मी किमान 15 षटकं पूर्ण होईपर्यंत फलंदाजी करावी आणि 30-40 धावांवर समाधान मानणं सोडून द्यावं असं युवराजला वाटतंय…
अभिषेकच्या फलंदाजीतील बदलाचं पहिल्यांदा दर्शन घडलं ते 2023-24 मोसमातील सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत. त्यानं त्यावेळी जेत्या पंजाबच्या वतीनं 192.46 च्या स्ट्राईक रेटनं 485 धावा ठोकल्या…2023 मध्ये ‘इंडियन प्रीमियर लीग’च्या विश्वात प्रवेश केल्यानंतर त्याला सुरुवातीलाच मार्गदर्शन मिळालं ते सनरायझर्सचे प्रशिक्षक राहिलेले वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लारा यांचं. ‘मी मोसमाला सुरुवात होण्यापूर्वी प्रचंड सराव केला होता. लारानं सल्ला दिला तो फटके मारण्याचा, परंतु त्या नादात बाद न होण्याचा नि ती बाब मी नेहमीच मनात बाळगलीय. मला वाटतं की, सामन्याच्या पहिला वा दुसरा चेंडू हाणण्याची क्षमता माझ्यात आहे. जेव्हा तुमचं वय लहान असतं तेव्हा जास्त विचार करण्याकडे कल नसतो, अभिषेक सांगतो…
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या दुसऱ्या मोसमात तर त्यानं केवळ 28 चेंडूंत शतकी खेळी केली आणि 285 धावांची नोंद केली ती 204.21 इतक्या प्रचंड ‘स्ट्राईक रेट’नं…तर भारतातर्फे 17 टी-20 सामन्यांत त्यानं 535 धावा जमविल्याहेत त्या 193.84 या ‘स्ट्राईक रेट’नं…भारत येऊ घातलेल्या मोसमात 13 टी-20 आंतरराष्ट्रीय लढती खेळणार असून त्यांचा शुभारंभ होईल तो ऑगस्ट महिन्यात. अभिषेकला त्याचे 19 वर्षांखालील संघातील साथीदार पंजाबचाच शुभमन गिल व गोव्यातर्फे खेळण्याचा निर्णय घेतलेला यशस्वी जैस्वाल यांच्या स्पर्धेला तोंड द्यावं लागणार असलं, तरी तो म्हणतोय की, आमच्यात शर्यत कधीच नव्हती. भारताच्या 16 वर्षांखालील संघापासून आम्ही एकत्र खेळतोय. आम्ही एकच स्वप्न पाहिलंय ते भारताचं प्रतिनिधीत्व करण्याचं…अभिषेक शर्माची क्षमता पाहता त्याच्यात बराच दूरचा पल्ला कापण्याची ताकद लपलीय !
धावांचा ‘अभिषेक’…
- हैदराबादतर्फे पंजाबविरुद्ध अभिषक शर्मानं आपलं अर्धशतक पूर्ण केलं ते 19 चेंडूंत…त्यानं काढलेल्या 141 धावा म्हणजे एखाद्या संघानं धावांचा पाठलाग करताना नोंदविलेली सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या…
- ‘आयपीएल’च्या इतिहासातील ही तिसऱ्या क्रमांकाची धावसंख्या. यापूर्वी वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलनं ‘आरसीबी’चं प्रतिनिधीत्व करताना 23 एप्रिल, 2013 रोजी पुणे वॉरियर्सविरुद्ध बेंगळूर इथं नाबाद 175 धावांचं तुफान उभं केलं होतं…तर न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅकलमनं 18 एप्रिल,. 2008 रोजी म्हणजे ‘आयपीएल’च्या पहिल्याच सामन्यात ‘केकेआर’तर्फे खेळताना ‘आरसीबी’विरुद्ध नाबाद 158 धावांची बरसात केली होती…
- अभिषेक शर्माचं हे ‘इंडियन प्रीमियर लीग’मधील पहिलं शतक असलं, तरी एकंदरित ‘टी-20’चा विचार करता सातवं…त्यानं यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतातर्फे दोन अन् सय्यद मुस्ताक अली चषक स्पर्धेत पंजाबच्या वतीनं चार शतकं झळकावलीत…
- यामुळं टी-20 क्रिकेटमध्ये सात शतकं खात्यात जमा करणारा अभिषेक हा सर्वात तऊण खेळाडू ठरलाय. ‘टी-20’च्या इतिहासात वयाची पंचविशी ओलांडण्यापूर्वी सर्वाधिक शतकं फटकावण्याचा बाबतीत त्यानं विश्वविक्रम मोडलाय तो शुभमन गिलचा…
- ‘टी-20’ क्रिकेटमधील एकूण शतकी खेळींच्या बाबतीत भारतीय खेळाडूंमध्ये अभिषेक विसावलाय तो विराट कोहली (9) आणि रोहित शर्मा (8) यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर…
अभिषेक शर्माची टी-20 कारकीर्द…
- विभाग सामने धावा सर्वोच्च सरासरी स्ट्राईक रेट शतकं अर्धशतकं
- आयपीएल 69 1568 141 26.13 159.68 1 7
- टी-20 आंतरराष्ट्रीय 17 535 135 33.44 193.85 2 2
– राजू प्रभू









