कोल्हापूर :
विनाकारण साखळी ओढून रेल्वे थांबविणे आता महागात पडणार आहे. यापूर्वी अशा कृत्याला एक हजार दंड होता. आता रेल्वे थांबविल्यामुळे होणारा खर्चच संबंधितांकडून वसुल करण्यात येणार आहे. मिनिटाला आठ हजार प्रमाणे दंड होणार आहे.
सर्वात स्वस्त आणि आरामदायी प्रवास म्हणून रेल्वे सेवा ओळखली जाते. रोज लाखो प्रवासी रेल्वेतून प्रवास करत असतात. प्रवासावेळी काही आपत्तकालिन परिस्थिती आली असल्यास रेल्वे थांबविण्यासाठी रेल्वेच्या डब्यात सोय केलेली आहे. येथील लाल रंगाची साखळी ओढल्यानंतर रेल्वे तत्काळ थांबते. वंदे भारत रेल्वेमध्ये हायटेक यंत्रणा लावली असून यामध्ये थेट स्पिकरवर रेल्वे चालकांशी बोलण्याची सोय आहे. तसेच स्वतंत्र बटनही केले आहे. आपत्तकालिन स्थिती असल्यासच साखळी ओढून रेल्वे थांबविली जाते.
काही हुल्लडबाज प्रवासी कारणनसताना साखळी ओढून रेल्वे थांबवितात. अशांवर रेल्वे प्रशासन दंडात्मक कारवाई करते. वैध कारण नसताना रेल्वे थांबवली तर अशा प्रवाशांवर रेल्वे कायद्याच्या 141 व्या कलमानुसार एक हजार रुपयांचा दंड किंवा एका वर्षाचा कारावास या दोन्ही पैकी एक शिक्षा होती. आता अकारण साखळी ओढून रेल्वे थांबवल्यास संबंधित प्रवाशांकडून एका मिनिटाला आठ हजार रुपये इतका दंड आकारण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वे थांबविल्यानंतर पुन्हा सुरू होईपर्यंत तितक्या कालवधीचा दंड वसुल केला जाणार आहे नव्या नियमाची उत्तर रेल्वे व पश्चिम मध्य रेल्वेने अंमलबजावणी सुरु केली आहे. मध्य रेल्वेनेही या संदर्भात न्याय अधिकारी तसेच कायदे तज्ञांशी चर्चा सुरु केली आहे.
रेल्वे थांबल्याने होणारा खर्च करणार वसुल
अनेकदा प्रवासी अकारण रेल्वे थांबवितात. त्याचा परिणाम वेळापत्रकावर तर होतोच याशिवाय रेल्वेच्या खर्चातही मोठी वाढ होते. गेल्या काही दिवसांत असे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे एक हजार दंडा ऐवजी रेल्वेस होणारा खर्च त्याच प्रवाशांकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.








