हिशेब देईपर्यंत शिवमूर्तीचे काम बंद ठेवण्याची सूचना : काम सुरू केल्यास आंदोलनाचा इशारा, ग्रामस्थांचा निर्णय
प्रतिनिधी /बेळगाव
राजहंसगड येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान आणि गड विकास कमिटीच्या अध्यक्ष व सेपेटरींनी गैरकारभार केला आहे. जोपर्यंत त्याचा पूर्ण हिशेब दिला जात नाही, तोपर्यंत राजहंसगडावरील शिवमूर्तीचे काम बंद ठेवण्याचा निर्णय राजहंसगड ग्रामस्थांनी घेतला आहे. सोमवारी ग्रामस्थांनी राजहंसगडावर जाऊन संबंधित काम थांबविले आहे.
राजहंसगड देवस्थान व गड विकास समितीची जोपर्यंत चौकशी होत नाही, तोपर्यंत येथील काम बंद ठेवण्याचा निर्णय इतर ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे सोमवारी बराच वेळ याठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मोठय़ा संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते. यावेळी त्यांनी संबंधित कंत्राटदाराला काम थांबविण्याची सूचना केली.
जिल्हाधिकाऱयांना यापूर्वी निवेदन देण्यात आले होते. या कमिटीने गैरव्यवहार केला असून त्याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली होती. मात्र, अद्याप त्याची कोणतीच चौकशी झाली नाही. त्यामुळे यापूर्वीचा संपूर्ण हिशेब जोपर्यंत दिला जात नाही, तोपर्यंत काम सुरू करायचे नाही. काम सुरू केल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. दोन्ही कमिटींमध्ये मोठा आर्थिक गैरप्रकार झाला आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. जोपर्यंत ग्रामस्थांसमोर संपूर्ण हिशेब मांडला जात नाही, तोपर्यंत काम सुरू करायचे नाही, असा निर्णय राजहंसगडच्या ग्रामस्थांनी घेतला आहे.
यावेळी सिद्धाप्पा पोवार, देवस्थानचे पुजारी शिवानंद मठपती, लक्ष्मण थोरवत, सुरेश थोरवत, बाळू इंगळे, हणमंत नावगेकर, सिद्धाप्पा नाईक, शिवानंद मठपती, बसवंत पोवार यांच्यासह मोठय़ा संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.









