लक्ष्मीटेक महालक्ष्मीनगर परिसरातील नागरिक संतप्त
बेळगाव : लक्ष्मीटेक महालक्ष्मीनगर येथील गुलमोहर रोडवर विनाकारण वृक्ष तोडणाऱ्या एकास स्थानिक नागरिकांनी रोखले. त्यामुळे विनाकारण होणारी वृक्षतोड थांबली. यामुळे वृक्षतोडणाऱ्या व स्थानिक नागरिकांमध्ये किरकोळ वाद झाला. शहर परिसरात विनापरवाना वृक्षतोडीचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे निसर्गसंपदेवर परिणाम होऊ लागला आहे. अशाप्रकारे लक्ष्मीटेक महालक्ष्मीनगर परिसरात शुक्रवारी एकास वृक्षतोड करताना स्थानिक नागरिकांनी रोखून समज दिली आहे. आपट्याच्या वृक्षावर घाव घालत असतानाच नागरिकांनी त्याला माघारी धाडले. विनाकारण वृक्षतोड करणाऱ्यांवर वनखात्याने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.









