देवस्थान पंच कमिटीचे पालकमंत्री-जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश
बेळगाव : बस्तवाड येथील बसवेश्वर देवस्थान पंचकमिटीला सरकारने 9 गुंठे जागा दिली होती. न्यायालयाने पंच कमिटीच्या बाजूने निकाल देऊन देखील राजकीय दबाव आणत संबंधित जागेत सर्व्हे करण्याचा प्रयत्न गावातील काही व्यक्तींकडून सुरू असल्याने हे प्रकार तात्काळ थांबवावेत, अशी मागणी बसवेश्वर देवस्थान पंचकमिटीने निवेदनाद्वारे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी व जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे केली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. बसवेश्वर देवस्थान पंचकमिटीसाठी सर्व्हे क्र. 166 मधील 15/बी 9 गुंठे गायरान जागा 22 सप्टेंबर 1983 मध्ये सरकारने दिली होती. 2010 मध्ये या जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न ग्राम पंचायतीकडून करण्यात आला. त्यावेळी देवस्थान पंचकमिटी न्यायालयात गेली होती. 2017 मध्ये न्यायालयाने बसवेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या बाजूने निकाल दिला. परंतु, पुन्हा या जागेवर ताबा करण्याचा प्रयत्न काही ग्रामस्थांकडून सुरू आहे.
अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न
राजकीय व्यक्तींना चुकीची माहिती पुरवून अधिकाऱ्यांवर दबाव आणत कारवाई करण्यास भाग पाडले जात आहे. सध्या या जागेवर कोर्टाचा मनाई आदेश असतानाही राजकीय बळाचा वापर करून तहसीलदारांकरवी कारवाई करण्यात येत आहे. तहसीलदारांनी जिल्हाधिकारी व एडीएलआर यांना कोणतीही माहिती न देता सर्व्हेचे काम सुरू केले आहे. हा कोर्टाचा अवमान असून हे तात्काळ थांबवावे, अशी मागणी बसवेश्वर देवस्थान पंचकमिटीतर्फे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन तसेच जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
66 एकर जागा गेली कुठे?
सर्व्हे क्र. 166 मधील 66 एकर जागा गायरानासाठी राखीव ठेवण्यात आली होती. त्यामुळे ही जागा गेली कुठे? याचा प्रथमत: सर्व्हे तहसीलदारांनी करावा. त्यानंतरच उर्वरित 9 गुंठ्यांचा सर्व्हे करावा, अशी मागणी देवस्थान पंचकमिटीने केली आहे.









