प्रतिनिधी /बेळगाव
बसुर्ते क्रॉस ते बेकिनकेरे सीमाहद्दीपर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली असून वाहतूक धोकादायक बनली आहे. याबाबत कित्येकवेळा तक्रारी देऊनदेखील लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाल्याने सोमवारी सकाळी 10 वाजता बेकिनकेरेनजीक रास्ता रोको केला जाणार आहे, अशी माहिती कामगार संघटनेचे सुनील गावडे यांनी दिली आहे.
बसुर्ते क्रॉस ते सीमाहद्दीपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनधारकांना वाहने चालविणे कठीण झाले आहे. सध्या होत असलेल्या पावसामुळे खड्डे आणि चिखलातूनच मार्गस्थ व्हावे लागत आहे. त्यामुळे अपघात वाढले आहेत. शिवाय वाहने नादुरुस्त होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे बसुर्ते क्रॉस ते सीमाहद्दीपर्यंतचा प्रवास ‘नको रे बाबा’ म्हणण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे.
उचगाव फाटा ते बसुर्ते क्रॉसपर्यंत रस्ता डांबरीकरण झाला आहे. मात्र, त्या पुढील दोन ते तीन किलोमीटरपर्यंतच्या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने वाहनधारकांना धक्के खातच वाहने चालवावी लागत आहेत. रस्त्यावरील खड्डय़ांची चाळण झाल्याने वाहनधारकांना पर्यायी मार्ग शोधावा लागत आहे.
या मार्गावर महाराष्ट्रातील कोवाड, नेसरी, आजरा, गडहिंग्लज या परिसरातील वाहनधारकांची वाहतूक संख्या अधिक असते. मात्र, रस्ता वाहतुकीसाठी कुचकामी ठरत असल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याबाबत अनेकवेळा निवेदने देऊनदेखील याकडे दुर्लक्ष झाल्याने बेकिनकेरे आणि अतिवाड गावातील ग्रामस्थांनी रास्ता रोको करण्याचा निर्धार केला आहे.









