कुली कामगार संघटनेची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : रेल्वेस्थानकांवर चालविल्या जाणाऱ्या ट्रॉली सेवेचे खासगी कंपन्यांना आऊटसोर्सिंगद्वारे काम देणे थांबवावे, केवळ दिव्यांग, वृद्ध व आजारी लोकांव्यतिरिक्त इलेक्ट्रीकच्या वाहनातून सामानाची वाहतूक करणे थांबवावे. यामुळे रेल्वेस्थानकांवर असणाऱ्या कुली व्यवसायाला फटका बसत आहे. याचा विचार करून रेल्वेमंत्र्यांनी यावर ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी श्री सिद्धारुढ स्वामी रेल्वे कुली पोर्टर्स संघाच्यावतीने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. सध्या सर्वच रेल्वेस्थानकांवर इलेक्ट्रिक बॅटरी असलेली वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
याचा वापर केवळ वृद्ध व आजारी लोकांसाठी होणे गरजेचे आहे. परंतु, त्याच वाहनातून साहित्याची ने-आण केली जात आहे. यामुळे कुली व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला आहे. बेळगाव, हुबळी यासारख्या मोठ्या रेल्वेस्थानकांवर काम करून कुली कामगार जीवन जगत आहेत. त्यामुळे ओझ्याची वाहतूक करण्याची परवानगी कोणत्याही खासगी कंपनीला देऊ नये, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष अली दावलसाब नदाफ, चंद्रू चलवादी, जाफर खान जमखानेवाले, आनंद रुद्रप्पण्णावर, अब्दुल बळ्ळारी, मंजू सिद्धापूर, गौस अत्तार, इमामसाब मणियार यांच्यासह इतर उपस्थित होते.









