कम्युनिस्ट पक्षाची राज्य सरकारकडे मागणी
बेळगाव : चन्नरायपट्टण (ता. देवनहळ्ळी) विभागातील भूसंपादन प्रक्रिया सरकारने बंद करावी व शेतजमिनी वाचविण्यासाठी आंदेलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांची कारागृहातून मुक्तता करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) बेळगाव जिल्हा संघटना समितीने केली आहे. संघटनेच्या सदस्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन राज्यपालांच्या नावे निवेदन दिले. कार्पोरेट कंपन्यांसाठी चन्नरायपट्टण विभागातील 1777 एकर शेतजमीन सरकारकडून जबरदस्तीने बळकावण्यात येत आहे. याला विरोध करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक करण्यात आली असून, शेतकऱ्यांवर हा घोर अन्याय आहे. सरकारने भूसंपादन प्रक्रिया बंद करण्याबरेबरच शेतकरी नेत्यांची कारागृहातून मुक्तता न केल्यास राज्यभरातून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना मंदा नेवगी, तुळजा माळोदकर, मीनाक्षी धपडे, उज्ज्वला लाखे, अनिता दंडगलकर आदी सदस्या उपस्थित होत्या.









