सांगली :
चीनमध्ये तयार केला जाणारा बेदाणा नेपाळमार्गे चोरट्या मागनि, बेकायदेशीपणे भारतात येतो आहे. त्याने भारतीय बेदाण्याचे दर पडले आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ही चोरटी आयात थांबवा, असे आवाहन खासदार विशाल पाटील यांनी बुधवारी संसदेत केले.
यावर्षी बेदाणा उत्पादक शेतकऱ्याला चांगल्या दराची अपेक्षा होती. उत्पादन कमी झाले होते. दर चांगले येणार होते. विशेषतः आता कृष्ण जन्माष्टमी आणि पुढे नवरात्र उत्सवानिमित्त उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात बेदाण्याची मागणी असते. त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. तोवर गेल्या काही दिवसांत चिनचा बेदाणा मोठ्या प्रमाणात बाजारात आला आणि एकच गोंधळ माजला. भारतीय बेदाण्याचा उठाव कमी झाला, दर पडले. याबाबत महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने विशाल पाटील यांची भेट घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी बुधवारी संसदेचे या प्रश्नावर लक्ष वेधले.
विशाल पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी द्राक्ष पीक घेतात. बेदाणा निर्मिती करतात. त्यातून त्यांना थोडे जास्त उत्पन्न मिळते. परंतू गेल्या काही दिवसांत चीनमध्ये तयार होणारा बेदाणा नेपाळमार्गे भारतात येतो आहे. ही बेकायदेशीर आयात आहे. त्याचा परिणाम म्हणून भारतीय बेदाण्याचा दर पडतो आहे. शेतकरी अडचणीत येत आहेत. ते आत्महत्येचा विचार करत आहेत. त्यामुळे तातडीने बेकायदेशीर आयात थांबवायला हवी.
याआधी बेदाणा निर्यातीला अनुदान मिळत होते. परिणामी भारतीय बाजारपेठेतील बेदाण्याची मागणी आणि आवक याचे गणित जमत होते. पुन्हा एकदा अनुदान सुरु करण्याची गरज आहे. शेतकरी हिताचे निर्णय गरजेचे आहेत. बेदाणा उत्पादकांच्या हिताचा निर्णय सरकारने करावा आणि त्यांना संकटातून बाहेर काढावे.








