सेन्सेक्स 215 अंकांनी घसरला ः सनफार्मा तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
दिवाळीपासून भारतीय भांडवली बाजारात सुरु असणाऱया तेजीला अखेर चालू आठवडय़ातील बुधवारच्या सत्रात पूर्ण विराम मिळाला आहे. यामध्ये जागतिक बाजारात मिळताजुळता कल राहिल्याने मागील चार सत्रांमध्ये प्राप्त केलेली तेजी अखेर थांबली आहे. दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 215.26 अंकांनी प्रभावीत होत बंद झाला आहे.
बाजारात सुरुवातीच्या काळात सकारात्मक सुरुवात केल्यानंतर सदरची तेजी कायम टिकवण्यात सेन्सेक्सला अपयश आल्याचे दिसून आले. यामध्ये बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 215.26 अंकांनी घसरुन निर्देशांक 0.35 टक्क्यांसह 60,906.09 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 62.55 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 18,082.85 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांपैकी सेन्सेक्समधील भारती एअरटेल, मारुती सुझुकी, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस, एचसीएल टेक, इंडसइंड बँक आणि टायटन यांचे मुख्य समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यामध्ये सनफार्मा, आयटीसी, टेक महिंद्रा, डॉ.रेड्डीज लॅब आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग मात्र तेजीसह बंद झाले आहेत. अमेरिकतील केंद्रीय बँक व्याजदर वाढवण्याच्या तयारीत असून 75 बेसीस पॉइंटस्ने व्याजदर वाढण्याचे संकेत आहेत. याचा दबाव भारतीय बाजारावर दिसतो आहे. सुरुवातीला सेन्सेक्सने 61,210 ची नवी पातळी गाठली होती.
जागतिक पातळीवरील आशियातील अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, चीनचा शांघाय कम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे लाभासह बंद तर जपानचा निक्की हा घसरणीसोबत बंद झाल्याची नेंद करण्यात आली आहे. युरोपमधील बाजारांमध्ये मिळताजुळता कल राहिला होता. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.17 टक्क्यांनी वधारुन 94.81 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहे.








