बेळगावच्या भाविकांची खासदार मंगला अंगडी यांच्याकडे मागणी
बेळगाव : बेळगाव परिसरातील अनेक कुटुंबांचे कुलदैवत जेजुरी येथील खंडोबा देवस्थान येथे आहे. त्यामुळे शेकडो भाविक बेळगाव परिसरातून जेजुरीला ये-जा करत असतात. परंतु, जेजुरी येथील रेल्वेस्थानकावर बेळगावमधून निघणाऱ्या एक्स्प्रेसला थांबा देण्यात आलेला नाही. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून जेजुरी येथे थांबा द्यावा, अशी मागणी बेळगावमधील नागरिकांनी खासदार मंगला अंगडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. विशेषत: सणासुदीच्या काळात जेजुरीला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. बेळगाव, खानापूर, चंदगड त्याचबरोबर चिकोडी, अथणी, निपाणी या परिसरातील शेकडो कुटुंबांचे जेजुरी येथे कुलदैवत आहे. यापूर्वी जेजुरी येथे एक्स्प्रेसला थांबा देण्यात आल्याने प्रवाशांची सोय होत होती. परंतु, सध्या मात्र एक्स्प्रेस थांबत नसल्याने प्रवाशांना एकतर पुढील स्टेशनला अथवा अलीकडील स्टेशनला उतरून तेथून टॅक्सी करून जेजुरी गाठावी लागत आहे. त्यामुळे नैत्य रेल्वेने किमान हुबळी-दादर अथवा गोवा एक्स्प्रेसला जेजुरी येथे थांबा द्यावा, अशी मागणी बेळगाव परिसरातील नागरिकांनी खासदार मंगला अंगडी यांच्याकडे केली. खासदार अंगडी यांनी आपण याबाबत हुबळी येथील रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा करू, असे आश्वासन दिले. यावेळी महादेव चौगुले, गणपत चौगुले, विलास चौगुले, विठ्ठल मोरे यासह इतर सदस्य उपस्थित होते.









