निफ्टी 17,550 वर ः बँक, धातू व वाहन क्षेत्रात तेजीचा कल
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशीच्या सत्रात मंगळवारी भारतीय भांडवली बाजारात सलगच्या दोन दिवसांची सुरु असलेली घसरण अखेर थांबली आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्स तब्बल 257 अंकांनी मजबूत होत बंद झाल्याचे दिसून आले आहे. प्रमुख क्षेत्रांपैकी यामध्ये बँक, धातू आणि वाहन कंपन्यांचे समभाग मजबूत स्थितीत राहिल्याने शेअर बाजारात तेजीचे वातावरण राहिले होते.
दिग्गज कंपन्यांमध्ये दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 257.43 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 59,031.30 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 86.80 अंकांनी वधारुन निर्देशांक 17,577.50 वर बंद झाल्याचे दिसून आले.
सेन्सेक्समध्ये प्रमुख कंपन्यांमध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, टायटन, टाटा स्टील, भारतीय स्टेट बँक, कोटक महिंद्रा बँक, सनफार्मा आणि इंडसइंड बँक यांचे समभाग प्रामुख्याने तेजीत राहिले. अन्य कंपन्यांमध्ये टाटा कन्सल्टेंसी सर्व्हिसेस, इन्फोसिस, एचसीएल टेक, हिंदुस्थान युनिलिव्हर, टेक महिंद्रा, विप्रो आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग प्रामुख्याने नुकसानीत राहिले आहेत.
आशियातील अन्य बाजारामध्ये दक्षिण कोरियातील कॉस्पी, जपानचा निक्की, चीनच शांघाय कम्पोजिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे नुकसानीत राहिले आहेत. तर युरोपीयन मुख्य बाजारामध्ये सुरुवातीला मिळताजुळता कल राहिला होता.
जागतिक घटनांचा प्रभाव
बाजारामधील अनिश्चितता असल्याच्या संकेतामुळे जागतिक बाजारांमध्ये नरमाईचा कल राहिला होता. यासोबतच बाजारात चढउताराची स्थिती राहिली होती. यामध्ये मजबूत देशातील अर्थव्यवस्थेमुळे युरोपमध्ये ऊर्जेच्या किमती वाढल्याने आणि अमेरिकेतील व्याजदरांमध्ये वृद्धी होण्याच्या संकेतामुळे जागातील बाजार दबावात राहिले असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
मुख्य क्षेत्रांची तेजी
देशातील बाजारात मंगळवारी बँक, वाहन आणि धातू या कंपन्यांच्या समभागात तेजीची स्थिती राहिली होती. तसेच आयटी क्षेत्रातील समभागातही विक्री राहिल्याने देशातील बाजार मजबूत राहिले. यावेळी आंतरराष्ट्रीय तेल मानक बेंट क्रूड 1.43 टक्क्यांनी वधारुन 97.85 डॉलर प्रति बॅरेलवर राहिल्याची नोंद करण्यात आली.









