सरन्यायाधीशांनी वकिलांना फटकारले : अनावश्यक स्थगितीसाठी अपील न करण्याचा इशारा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
न्यायालयातील खटले वारंवार पुढे ढकलणे, पुढील तारीख घेणे आणि न्यायालयात सुनावणीची तारीख वाढवण्याची वारंवार मागणी करणे या सध्या सुरू असलेल्या प्रवृत्तीवर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. ‘मला हे न्यायालय ‘तारीख-पे-तारीख’ कोर्ट बनवायचे नाही’ असे वक्तव्य त्यांनी आपल्या कोर्टरूममध्ये केले. यावेळी सरन्यायाधीशांनी वकिलांना अनावश्यक स्थगितीसाठी अपील न करण्याचे आवाहन केले आहे.
तात्काळ सुनावणी होणाऱ्या खटल्यांची यादी तयार केली जात असतानाच सरन्यायाधीशांनी शुक्रवारी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयातील विविध खटल्यांच्या सुनावणीदरम्यान वकिलांनी स्थगिती देण्याची मागणी आणि पुढील तारखेसाठी केलेल्या अपीलबाबत सरन्यायाधीशांनी शुक्रवार, 3 नोव्हेंबर रोजी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. दिवसभराचे कामकाज सुरू होताच सरन्यायाधीशांनी वकिलांनी नव्या प्रकरणांमध्ये स्थगिती देण्याची मागणी केल्याचा मुद्दा उपस्थित केला. वकिलांच्या विनंतीवरून तात्काळ खटल्यांची यादी तयार केल्यानंतर सुनावणी सुरू होण्यापूर्वी वकिलांनी त्या प्रकरणांवर स्थगिती देण्याची मागणी केल्यामुळे सरन्यायाधीशांनी आक्षेप घेतला. अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच खटल्यांना स्थगिती देण्याची विनंती केली जावी, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी बार सदस्यांना ठणकावले. न्यायालयांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने खटले प्रलंबित असताना त्यांचा निपटारा होण्यासाठी बराच वेळ लागणार आहे, असेही ते पुढे म्हणाले.
2 महिन्यांमध्ये 3,688 स्थगिती अर्ज
आपल्यासमोर आज 178 स्थगिती स्लिप्स आहेत. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत न्यायालयाच्या सुनावणीच्या दिवसात सरासरी 154 स्थगिती स्लिप देण्यात आल्या आहेत. तसेच गेल्या दोन महिन्यात 3 हजार 688 स्थगिती स्लिप्स न्यायालयात सादर करण्यात आल्या. अशा कृतीमुळे खटले जलदगतीने निकालात काढण्याचा उद्देश असफल होत असल्याचेही सरन्यायाधीश म्हणाले.
सप्टेंबरपासून न्यायालयात तातडीच्या सुनावणीसाठी 2 हजार 361 प्रकरणांची यादी करण्यात आली असून त्यात दररोज सरासरी 59 प्रकरणांची सुनावणी होऊ शकली. म्हणजेच एकीकडे खटल्यांची तातडीने सुनावणी घेण्याचे आवाहन करण्यात आले आणि दुसरीकडे सुनावणी होणार असताना ती पुढे ढकलण्याचा अर्ज देणे हे परस्परविरोधी असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
…तर नागरिकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल!
खटले किंवा प्रकरणे वारंवार तहकूब केल्याने नागरिकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल अशी भीती सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केली. एकीकडे खटले तातडीने सुनावणीसाठी सूचीबद्ध केले जातात आणि नंतर ते पुढे ढकलले जातात. अशा ‘तारीख पे तारीख’ मुळे न्यायालयावरील जनतेचा विश्वास नष्ट होईल, असेही ते पुढे म्हणाले.
चित्रपटातील ‘डागलॉग’ला उजाळा
सरन्यायाधीशांच्या या टिप्पणीमुळे चित्रपटातील आठवणीही ताज्या झाल्या आहेत. 1993 मध्ये प्रसिद्ध हिंदी चित्रपट ‘दामिनी’मधील सनी देओलच्या प्रसिद्ध डायलॉगमुळे ‘तारीख पे तारीख’ हा संवाद लोकप्रिय झाला होता. या चित्रपटात वकिलाची भूमिका साकारणाऱ्या सनी देओलने एका खटल्यातील सुनावणी वारंवार पुढे ढकलल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या संवादातून न्याय व्यवस्थेतील दिरंगाई दिसून येते. मात्र, आता सरन्यायाधीशांनी या संवादाची आठवण करून देत वकिलांकडून चालू असलेल्या दिरंगाईवर नाराजी व्यक्त केली आहे.









