विरोधी पक्षनेते आर. अशोक यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
बेळगाव : गरीब, शेतकरी, मठ-मंदिरांच्या मालमत्तेवर वक्फची मालमत्ता अशा नोंदी करण्यात येत आहेत. ते त्वरित रद्द करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. गेल्या एक-दोन महिन्यापासून कर्नाटकात वक्फ बोर्डचा मुद्दा गाजतो आहे. याविषयी विधानसभेत चर्चेला सुरुवात करताना काँग्रेसवर त्यांनी हल्लाबोल केला. वक्फ बोर्डकडून शेतकऱ्यांना, मठ-मंदिरांना वक्फच्या जमिनी बळकावल्याचे सांगत नोटिसा पाठविण्यात येत आहेत. याआधी कर्नाटकात लव जिहाद सुरू होता. आता लँड जिहाद सुरू झाला आहे. वक्फ बोर्डमुळे लोक भयभीत झाले आहेत. वक्फ अदालतच्या नावे गोंधळ निर्माण करण्याचे त्वरित थांबवावे. केंद्र सरकार वक्फ कायद्यात दुरुस्ती करत आहे. या दुरुस्तीला सर्वानुमते पाठिंबा देण्याची मागणीही आर. अशोक यांनी केली. खऱ्या अर्थाने जे मुसलमान आहेत, त्यांच्याकडून दान स्वरुपात आलेली मिळकतच वक्फची मिळकत ठरते. मात्र, वडिलोपार्जित जमिनी, शाळा, मठ-मंदिरांच्या मालमत्तांवर वक्फ बोर्डचे नाव चढविण्यात येत आहे. सरकारी जमिनीवरही हक्क गाजविण्यात येत आहे. वनजमीनही वक्फ बोर्डची मालमत्ता असल्याचे घोषित करत आहे. यासाठी अधिकाऱ्यांवर दमदाटी सुरू आहे, असा आरोप आर. अशोक यांनी केला.
देशातील मालमत्तांचे अस्तित्व धोक्यात
मनमोहन सिंग पंतप्रधान असताना मालमत्ता ताब्यात घेण्याचा वक्फ बोर्डला अधिकार दिला. यासाठी कायद्यात दुरुस्ती कली. वक्फ बोर्ड जी मालमत्ता आपली आहे, असे सांगेल ती त्यांचीच असा तो कायदा आहे. या कायद्यामुळेच देशभरातील मालमत्तांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याआधी केवळ दान रुपातून मिळालेली जमीनच वक्फ बोर्डची जमीन ठरत होती. नव्या कायद्यामुळे ते सांगतील त्या जमिनीवर त्यांचा हक्क प्रस्थापित करीत आहेत, असे सांगत आर. अशोक यांनी राज्यातील परिस्थिती सविस्तरपणे मांडली.
अलीकडेच आपण म्हैसूरला भेट दिली होती. मुनेश्वरनगर वसाहतीतील 110 जणांच्या घरावर वक्फ बोर्डने आपला हक्क सांगितला आहे. देशाच्या फाळणीनंतर भारतात परतलेल्या हिंदूंच्या मालमत्तेवर पाक सरकारचे नाव चढले. आपल्या देशात मात्र असे झाले नाही. काँग्रेसप्रणित केंद्राने अन्य धर्मियांच्या मालमत्तेवर हक्क सांगण्याचा अधिकार त्यांना दिला. केवळ ही जमीन आपली आहे, असे वक्फ बोर्डला वाटले तरी त्या जमिनीवर त्यांचा हक्क प्रस्थापित होतो, अशी परिस्थिती आहे. उलट शेतकऱ्यांनाच तिथे सिद्ध करावे लागते. वक्फ बोर्डला मात्र ते सिद्ध करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. वक्फ अदालतच्या नावे सुरू असलेला गोंधळ थांबविण्याची मागणी अशोक यांनी केली.
सभागृहात चुकीची माहिती देऊ नका : आमदार राजू सेठ
वक्फ बोर्डच्या मुद्द्यावर आर. अशोक बोलताना आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव व महसूलमंत्री कृष्ण भैरेगौडा यांनी वारंवार प्रश्न उपस्थित करीत हरकत घेतली. बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनीही सभागृहात चुकीची माहिती देऊ नका, अशी मागणी केली. काँग्रेसचे मंत्री व आमदारांचा हस्तक्षेप वाढताच बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी दिनेश गुंडूराव यांना वक्फचा इतका पुळका का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर या नेत्यांनी सभागृहात चुकीची माहिती देऊन दिशाभूल करू नका, अशी मागणी केली. सर एम. विश्वेश्वरय्या यांनी शिकलेल्या शाळेवरही आज वक्फ बोर्डने दावा केला आहे, अशी माहिती आर. अशोक यांनी दिली.









