म. ए. युवा समितीची मागणी : केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या साहाय्यक आयुक्तांना निवेदन
बेळगाव : बेळगावातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून कन्नडसक्ती केली जात आहे. बहुसंख्य मराठी भाषिक असतानाही दुकाने, तसेच सरकारी कार्यालयांवर मराठीला स्थान न देता अगोदर असलेले मराठी फलक काढून तेथे कन्नड भाषेतील फलक लावले जात आहेत. बस व राष्ट्रीय महामार्गावरदेखील मराठी फलक नाहीत. त्यामुळे प्रशासनावर कारवाई करा, अशी मागणी युवा समिती सीमाभागच्यावतीने केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाचे साहाय्यक आयुक्त एस. शिवकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे कार्यालय बेळगावमधून चेन्नईला हलविण्यात आले. तेव्हापासून अत्याचारात आणखी वाढ झाली.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने दिल्ली येथे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले होते. भाषिक सक्ती केली जात असेल तर त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. ज्या भागात 15 टक्क्यांहून अधिक मराठी भाषिक आहेत, त्यांना त्यांच्या भाषेत सुविधा पुरवाव्यात, असे कायद्याद्वारे स्पष्ट करूनही मराठी भाषिकांना कोणतीही कागदपत्रे मराठीतून देण्यात येत नाहीत. येत्या ता. पं. व जि. पं. निवडणुकांमध्ये सर्व कागदपत्रे मराठीतून पुरवावीत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, खजिनदार नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्यासह इतर उपस्थित होते.









