सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध : प्रसंगी अधिकाऱ्यांना काळे फासू
उचगाव /वार्ताहर
उचगाव महामार्ग उड्डाण पुल ते गडमुडशिंगी स्वागत कमानी पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासनाला निवेदने देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने उचगाव (ता. करवीर) येथे मणेर मळ्यानजिक करवीर शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
हुपरी -कोल्हापूर रस्त्यावर उचगाव महामार्ग उड्डाण पुल ते गडमुडशिंगी स्वागत कमानीपर्यंत मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यामुळे छोटे मोठे अपघात होत आहेत. हा राज्य मार्ग असल्याने सुत गिरणीचे कंटेनर, स्कुल बसेस अशा मोठ्या रहदारीचा हा मार्ग आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल २६ जुलै रोजी निवेदन देवूनही व २९ ऑगस्ट रोजी खड्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे फलक लावूनही निषेध नोंदविण्यात आला होता. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नवीन रस्ता अथवा दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या रस्ता रोको च्यावेळी आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा घोषणा देऊन निषेध केला. प्रशासनाने यापुढेही रस्ता दुरुस्ती किंवा नवीन केला नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दारामध्ये करवीर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. प्रसंगी अधिकाऱ्यांना काळे फासण्यात येईल, असा इशारा तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट यांनी आंदोलन स्थळी दिला. दिपक पाटील, विक्रम चौगुले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर टिकेची झोड उठवली. शरद माळी, दिपक रेडेकर, फेरीवाले संघटना तालुकाप्रमुख कैलास जाधव, सागर पाटील, राहुल गिरुले आदी प्रमुख शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीकांत सुतार यांनी निवेदन स्वीकारले. आंदोलनस्थळी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त तैनात होता.