मणतुर्गा, शिंदोळी ग्रा. पं. क्षेत्रातील एसडीएमसीची मागणी : तालुका स्तरावरील अधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /खानापूर
तालुक्यातील काही शाळांमध्ये एनजीओमार्फत मध्यान्ह आहार पुरविण्यात येत आहे. या मध्यान्ह आहाराच्या दर्जाबाबत अनेकवेळा तक्रारी आल्या आहेत. हा मध्यान्ह आहार बंद करून पुन्हा शाळेतच स्वयंपाक तयार करण्यास अनुमती देण्यात यावी, अशी मागणी मणतुर्गा, शिंदोळी ग्राम पंचायत क्षेत्रातील शाळांच्या एसडीएमसी पदाधिकाऱयांनी खानापूर तालुका मध्यान्ह आहार अधिकारी परीट यांच्याकडे केली. यावेळी प्रल्हाद मादार, मऱयाप्पा पाटील, नारायण कापोलकर, प्रदीप पाटील, मोनेश्री कुलम यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
खानापूर तालुक्यात 160 शाळांना मध्यान्ह आहार एनजीओमार्फत पुरवण्यात येतो. हा आहार सकाळी लवकर डब्यात घालून शाळांना पुरवला जातो. दुपारी दीडनंतर विद्यार्थ्यांना हा आहार वितरीत करण्यात येतो. सदर आहाराचा दर्जाही निकृष्ट असल्याने अनेक विद्यार्थ्यांची तब्येत बिघडत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे शाळेतच मध्यान्ह आहार तयार करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी तालुका मध्यान्ह आहार अधिकारी परीट म्हणाले, याबाबत जिल्हा पंचायतीतील आहार पुरवठा अधिकारी यांच्याकडेही आपल्या तक्रारीची नोंद करावे. तसेच याबाबत आपली तक्रार असल्यास पुढील काही दिवसात निश्चितच माध्यान्ह आहार शाळेत करण्याबाबत आपल्याकडून पाठपुरावा करण्यात येईल.









