खादरवाडी ग्रामस्थांचा पिरनवाडी नगरपंचायतीवर मोर्चा
वार्ताहर /किणये
पिरनवाडी नगरपंचायतीमध्ये संगणक उताऱ्यासाठी भरमसाठ रक्कम आकारण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना संगणक उतारा घेण्यासाठी सुमारे 20 ते 40 हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हे परवडणारे नाही. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे. या नगरपंचायतीमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या खादरवाडी गावातील नागरिकांनी पिरनवाडी नगरपंचायतीवर मंगळवारी सकाळी मोर्चा काढून संगणक उताऱ्यासाठी होणारी लूटमार थांबवा. तसेच गावातील विविध नागरी समस्या सोडवा, अशी मागणी करण्यात आली. खादरवाडी गावात विविध नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत. गावात पिण्याचे पाणी सुरळीत नाही. तसेच माळवी गल्लीतील रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. बऱ्याच ठिकाणचे पथदीप बंद झालेले आहेत. नागरिकांना घरपट्टी भरमसाठ प्रमाणात भरावी लागत आहे. तसेच संगणक उताऱ्यासाठी अवाढव्य रक्कम घेण्यात येत आहे. या सर्व समस्यांना नागरिक अक्षरश: वैतागून गेलेले आहेत.
संतप्त झालेल्या खादरवाडी गावातील नागरिकांनी मंगळवारी सकाळी पिरनवाडी नगरपंचायतीवर भव्य प्रमाणात मोर्चा काढून सर्वसामान्य नागरिकांची होणारी लूटमार थांबवावी, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी नोडल अधिकारी उपस्थित नव्हते. त्यांना फोनद्वारे नागरिकांनी संपर्क साधला. यावेळी सदर नोडल अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र नागरिकांनी त्यांना फोनवरच चांगलेच धारेवर होते. तुमच्या मागणीचे निवेदन द्या, आम्ही यावरती विचार करून योग्य तो तोडगा काढू, असे आश्वासन सदर नोडल अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर उपस्थित नगर पंचायतीमधील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आणि यावरती आठ दिवसांमध्ये योग्य तो तोडगा काढावा. अन्यथा आम्ही तीव्र प्रमाणात आंदोलन छेडू असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी राकेश पाटील, प्रल्हाद कामती, राजेश पाटील, अरुण माळवी, रमेश माळवी, विशाल पाटील आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.









