मध्यवर्ती म. ए. समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : अन्यथा भव्य मोर्चाचा इशारा
बेळगाव : बेळगाव शहरासह बेळगाव तालुका, खानापूर, निपाणी, अथणी या तालुक्यांमध्ये मराठी भाषिकांची संख्या अधिक आहे. तरीदेखील भाषिक अल्पसंख्याक आयोगाने दिलेले अधिकार डावलून कन्नडसक्ती केली जात आहे. बेळगाव महानगरपालिका, तसेच ग्राम पंचायतींमध्ये सुरू असलेली कन्नड भाषेची सक्ती तात्काळ थांबवावी, अशी मागणी मध्यवर्ती म. ए. समितीने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मध्यवर्ती म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कन्नड सक्तीबाबत चर्चा केली. मागील काही दिवसांत बेळगाव महानगरपालिकेत कन्नडसक्ती केली जात आहे. कन्नडसक्ती करताना यापूर्वी लावण्यात आलेले मराठी फलक काढण्यात आल्याने मराठी भाषिकांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त केली. बेळगाव शहरात सर्वाधिक मराठी भाषिक असताना त्यांच्या हक्कांचे उल्लंघन केले जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. काही कानडी संघटनांकडून मराठी भाषिकांना लक्ष्य केले जात आहे.
मराठीचा हक्क मागणाऱ्या नगरसेवकांविरोधात गरळ ओकण्यात आली. तसेच त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. त्यामुळे कानडी संघटनांना जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ आवर घालावा, अन्यथा मराठी भाषिक भव्य मोर्चा काढतील, असा इशाराही देण्यात आला. भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या शिफारशींनुसार 15 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या एखाद्या भाषिक समुदायाची असेल तर त्यांना त्यांच्या भाषेमध्ये कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. परंतु, इथे मराठी फलक लपविण्याचे प्रकार सुरू आहेत. ग्राम पंचायतींमध्ये सर्वच व्यवहार कन्नड भाषेत करण्याचा आग्रह केला जात आहे. याचा परिणाम स्थानिक नागरिकांवर होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, अॅड. अमर यळ्ळूरकर, आर. एम. चौगुले, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके, नेते रमाकांत कोंडुसकर, नेताजी जाधव, अॅड. एम. जी. पाटील, धनंजय पाटील, रावजी पाटील, आर. आय. पाटील, सुधा भातकांडे, मनोहर संताजी यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
भाषिक तेढ निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये
मराठी भाषिकांचे प्रश्न मला माहीत आहेत. त्यामुळे त्यांची जी मागणी असेल ती सरकारपर्यंत पोहोचविली जाईल. भाषिक अल्पसंख्याक आयोगाने दिलेले अधिकार मराठी भाषिकांना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे भाषिक तेढ निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर केले.









