अन्यथा आंदोलनाचा नागरिकांचा इशारा : वाहने रुतण्याच्या संख्येत वाढ : बससेवा विस्कळीत-विद्यार्थी वर्गांचे हाल
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी-खानापूर राज्य महामार्गावर अद्याप अवजड वाहतूक सुरूच असून, यामुळे रस्त्याची पार दुर्दशा तर झालीच आहे. मात्र वाहाने रस्त्याच्या बाजूला रुतल्याने रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी या मार्गावरील बससेवा पूर्णपणे विस्कळीत होत असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या रस्त्यावरील अवजड वाहतूक त्वरित बंद करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. जांबोटी-खानापूर या 18 किलोमीटर रस्त्याचा समावेश जत्त-जांबोटी राज्यमार्ग क्रमांक 31 अंतर्गत होतो. हा खानापूर तालुक्यातील आंतरराज्य वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावरून गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र आदी राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात माल व प्रवासी वाहतूक चालते. वाहतूकदार गोव्याला जोडणारा जवळचा रस्ता म्हणून या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत.
सध्या बेळगाव-चोर्ला रस्त्यावरील कुसमळी नजीकच्या मलप्रभा नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे तसेच अनमोड घाट राष्ट्रीय महामार्गावर दरडी कोसळल्याने दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे गोव्याला जोडणारे दोन्हीही रस्ते अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून गोवा-बेळगाव अवजड वाहतूक करणारी मल्टी एक्सेल वाहने जांबोटी-खानापूर बेळगाव या मार्गाचा अवलंब करीत आहेत. परिणामी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच रस्त्याची देखील पूर्णपणे वाताहात झाली आहे. जांबोटी-खानापूर या रस्त्याचा दर्जा राज्य महामार्गाचा असला तरी या रस्त्याच्या विकासाकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्याची रुंदी केवळ साडे तीन मीटर इतकी अरुद असून हा रस्ता घाट वळणांचा असल्यामुळे या रस्त्यावर समोरुन येणाऱ्या वाहनांना बाजू देताना अवजड वाहतूक करणारी मल्टी एक्सेल वाहने रस्त्याच्या बाजूपट्ट्यावर रुतून बसत असल्यामुळे इतर वाहनांना जाण्यास जागाच मिळत नाही. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
वाहतूक ठप्पमुळे बसफेऱ्या रद्द
जांबोटी-खानापूर रस्त्यावर अवजड वाहने रुतून वाहतूक ठप्प होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे या भागातील बससेवेवर देखील विपरीत परिणाम होत आहे. रस्त्यावरील वाहतूक ठप्प होण्याच्या समस्येमुळे अनेक गावंच्या बसफेऱ्या रद्द किंवा उशिरा धावत असल्यामुळे या भागातून बेळगाव-खानापूर येथे महाविद्यालयीन तसेच माध्यमिक शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून, विद्यार्थीवर्गांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी आमदार विठ्ठल हलगेकर व बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून जांबोटी-खानापूर राज्य महामार्गावरील अवजड वाहतूक त्वरित बंद करण्याचा आदेश द्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा या भागातील नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.









