युवा समितीचे पोलीस आयुक्तांना निवेदन
बेळगाव : शहरात अवजड वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी तर वाढतच आहे, त्याचबरोबर अपघातही वाढले आहेत. शाळांच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असल्याने ही वाहतूक थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. ऑगस्ट 2022 मध्ये कॅम्प येथे अवजड वाहनाच्या धडकेत एका मुलाचा मृत्यू झाला होता. यामुळे खडबडून जागे झालेल्या पोलीस प्रशासनाने शाळांच्या वेळेत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लादले होते. परंतु, सध्या शाळेच्या वेळेत तसेच शाळांच्या परिसरातून अवजड वाहतूक बिनदिक्कतपणे सुरू आहे. यामुळे रेल्वे उड्डाणपूल तसेच प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडी होत असून पालकांना ये-जा करणेही अवघड होत आहे. शाळांच्या वेळेत सकाळी 8 ते 10.30 व दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये अवजड वाहतूक बंद ठेवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबत योग्य ती पावले उचलली जातील, असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, सरचिटणीस श्रीकांत कदम, विनायक कावळे, सूरज कुडूचकर, किरण हुद्दार, संतोष कृष्णाचे, अॅड. वैभव कुट्रे, शेखर तळवार यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









