रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : पुन्हा न्यायालयात जाण्याचा शेतकऱ्यांचा इशारा
बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याला न्यायालयाची स्थगिती असतानाही काम सुरू करण्यात आले आहे. सदर काम त्वरित थांबविण्यात यावे. शेतकऱ्यांना न्याय द्यावा, पिकावू जमीन संपादित करू नये, अशी मागणी करत रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. हलगा-मच्छे बायपास रस्त्यासाठी शेतकऱ्यांच्या पिकावू जमिनी संपादित केल्या जात आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांवर जमीन गमाविण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या व्यवसायावर गंडांतर आले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिकावू जमिनी रस्त्यासाठी संपादित करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. यामुळे सदर जमिनी घेण्यास शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांकडून रस्त्याला पिकावू जमिनी देण्यास विरोध केला जात आहे. पोलीस बळाच्या जोरावर जमिनी संपादित करण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. न्यायालयाने रस्ते कामाला महामार्ग प्राधिकरणाला स्थगिती आदेश दिला आहे. उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश देऊनही काम सुरू करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. नियोजित काम त्वरित थांबविण्यात यावे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले जात आहे. याविरोधात पुन्हा न्यायालयात जाऊ, असा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे. यावेळी शेतकरी नेते प्रकाश नाईक यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.









