सभापती रमेश तवडकर यांच्याकडून गांधीधाम रेल्वेचे स्वागत करून सुरुवात, वर्षभरातील प्रयत्न सत्कारणी
काणकोण : काणकोणच्या रेल्वे स्थानकावर अखेर नेत्रावती आणि गांधीधाम या जलद रेल्वेंना थांबा मिळाला असून काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर, काणकोण भाजप मंडळ, काणकोण पालिका मंडळ, काणकोण ज्येष्ठ नागरिक मंच, स्वाभिमानी जागरूक नागरिक, व्हिजन अँड मिशन काणकोण, जनसेना वॉरिअर्स, काणकोण पत्रकार संघ, आणि काँग्रेस कार्यकर्ते यांनी मागील वर्षभरापासून संघटितपणे केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. वरील रेल्वेगाड्यांपैकी गांधीधाम रेल्वेचे काणकोणच्या रेल्वे स्थानकावर 5 रोजी सभापती रमेश तवडकर यांनी स्वागत केले आणि बावटा दाखविला. जवळजवळ तीन वर्षांनंतर बंद पडलेला रेल्वेचा थांबा पूर्ववत सुरू करण्यात आला असून यावेळी काणकोणचे नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर, उपनगराध्यक्ष लक्ष्मण पागी, नगरसेवक गंधेश मडगावकर, आगोंदच्या सरपंच फातिमा रॉड्रिग्स, खोतीगावचे सरपंच आनंदू देसाई, लोलयेचे उपसरपंच चंद्रकांत सुदिर, सेंत्रु प्रोमोतोर द इस्त्रgसांव शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष शांबा देसाई, भाजपाचे महेश नाईक, विशाल देसाई, शाबा देसाई, काणकोणच्या ज्येष्ठ नागरिक मंचाचे गिलेर्म मार्टिन्स, रामकृष्ण नायक, झिलू शेट, दिलखुश शेट, किरण फळदेसाई, पंच प्रभाकर गावकर, उल्हास देसाई, आशा नगर्सेकर, वैजयंती प्रभुगावकर, नाटिविदाद डिसा, आशा भट, सागर नगर्सेकर आणि अन्य नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सर्वांच्या प्रयत्नांतून थांबा साध्य : तवडकर
यावेळी कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सुनील नारकर यांनी खास उपस्थिती लावली. त्यांचे काणकोणच्या नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर मत्स्यगंधा आणि नेत्रावती या जलद रेल्वेंना देखील काणकोणच्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळणार असून रेल्वे मंत्रालयाने काणकोणच्या जनतेच्या मागणीवर सकारात्मक विचार करून न्याय दिल्याबद्दल सभापती तवडकर यांनी यावेळी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. येथील व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, पालिका मंडळ आणि इतरांच्या प्रयत्नांतून ही गोष्ट साध्य झालेली आहे. सकारात्मक विचार करून आपण हा विषय पुढे केंद्रीय मंत्रालयापर्यंत नेला आणि काणकोणच्या नागरिकांचे स्वप्न साकार केले, असे तवडकर पुढे म्हणाले. कोरोना महामारीच्या काळात या स्थानकावरील जलद रेल्वेगाड्यांचा थांबा बंद करण्यात आला होता. मात्र काणकोणचे ज्येष्ठ नागरिक, सभापती तवडकर, नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे पूर्ववत थांबा साध्य झाला असल्याचे मत नारकर यांनी मांडले. थांबा देण्यात यावा यासाठी आंदोलन करण्यात आल्यानंतर ही मागणी पूर्ण होण्याच्या दृष्टीने सभापती तवडकर यांनी विशेष प्रयत्न केल्याचे मत रमाकांत ना. गावकर यांनी व्यक्त केले. या मागणीपोटी काणकोणच्या रेल्वे स्थानकावर उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात आला होता. सभापती तवडकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यापर्यंत हा प्रश्न मांडून काणकोण पालिका मंडळ, काणकोण भाजप मंडळाच्या साक्षीने निवेदन दिल्यानंतर अखेर न्याय मिळाला. त्यामुळे काणकोणच्या नागरिकांनी तवडकर आणि रेल्वे मंत्रालयाचे अभिनंदन केले आहे.









