विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चाद्वारे निवेदन
बेळगाव : औषध विक्रेते प्रतिनिधींतर्फे विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. कंपन्यांकडून होणाऱ्या शोषणाविरोधात प्रतिनिधींनी सरकारला मध्यस्ती करण्याची मागणी केली आहे. विक्री प्रतिनिधी कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी. होणारे शोषण थांबविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. कर्नाटक स्टेट मेडिकल अॅण्ड सेल्स रिप्रेझेंटीटिव्ह असोसिएशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपली खंत व्यक्त केली. विक्री प्रतिनिधींना कंपन्यांकडून अनेक अटी घातल्या जात आहेत. त्यामुळे तणावग्रस्त वातावरणामध्ये काम करावे लागत आहे. विक्री प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या कामगारांसाठी असणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी. कायद्यानुसार कामगार हक्कांचे संरक्षण करण्यात यावे. नियमानुसार वेतन देण्यात यावे. सेवा सुरक्षितता देण्यात यावी, कामगारांना दिल्या जाणाऱ्या सेवा, सुविधा पुरविण्यात याव्यात, सरकारी रुग्णालयांमध्ये औषध विक्री प्रतिनिधींना निर्बंध असून हे निर्बंध उठविण्यात यावेत. कंपन्यांकडून प्रतिनिधींना जीपीएस आणि जीपीआरएसद्वारे ट्रॅकिंग केले जात आहे. यामुळे प्रतिनिधींच्या स्वातंत्र्यावर गदा येत आहे. ही प्रक्रिया रद्द करण्यात यावी. सध्याच्या महागाईच्या परिस्थितीत प्रतिनिधींना 25 ते 30 हजार वेतन देण्यात यावे. तसेच औषधे विक्रीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी दबाव आणून शोषण करण्यात येत आहे. हे शोषण थांबविण्यात यावे, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघटनेतर्फे निवेदन सादर करण्यात आले. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.









