मडगाव पालिकेकडून कठोर कारवाईचा इशारा
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव शहरातील नाल्यांमधील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याचे प्रकरण उच्च न्यायालयाच्या कक्षेत असल्याने मडगाव पालिकेच्या अधिकाऱयांनी अखेर मडगावातील व्यावसायिक आस्थापने आणि निवासी घरांच्या मालकांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एक जाहीर नोटीस काढून त्यामध्ये, सर्व निवासी घरे, इमारती, हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना त्यांचे सांडपाणी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या गटारांमध्ये सोडणे थांबविण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
सांडपाणी भू-गटारात सोडावे किंवा इतर कोणत्याही योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावावी, असे निर्देश त्यात दिले आहेत. पालिकेने अशा प्रकारच्या उल्लंघनावर 5 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यासह कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. पालिकेच्या असे निदर्शनास आले आहे की, काही निवासी घरे, इमारती, हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक आस्थापने त्यांचे सांडपाणी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या नाल्यांत वळवत वा सोडत आहेत. पावसाच्या पाण्यासाठीची गटारे व नाल्यांमध्ये सांडपाणी वाहत असल्याचे आढळून येते. यामुळे जलस्रोत प्रदूषित होत असल्याचे नोटिसीत म्हटले आहे.
गोवा नगरपालिका कायदा, 1968 आणि पर्यावरण संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींनुसार चुकार आस्थापनांवर आणि रहिवाशांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करताना पालिकेने पुढे उल्लंघन करणाऱयांचे पाण्याचे कनेक्शन तोडले जाईल, असा इशारा दिला आहे. या सांडपाणी नाल्यात सोडण्याच्या प्रकरणाची न्यायालयाने दखल घेतली आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.









