नवी दिल्ली :
चीनकडून ब्रह्मपुत्रा नदीवर उभारण्यात येणाऱ्या धरणाचा मुद्दा भाजपचे खासदार दिलीप सैकिया यांनी संसदेत उपस्थित केला. ब्रह्मपुत्रा नदीवर चीन सर्वात मोठ्या धरणाची निर्मिती करू पाहत आहे. यामुळे भारत, विशेषकरून ईशान्येतील राज्यांमध्ये आपत्तींचा धोका वाढला आहे. शेजारी देशासोबत याप्रकरणी चर्चा करत हा प्रकल्प रोखण्यात यावा असे आसामच्या दरांग-उदलगुडीचे खासदार सैकिया यांनी म्हटले आहे. तिबेटच्या क्षेत्रात निर्माण करण्यात येणाऱ्या या धरणामुळे भारत आणि बांगलादेश दोघांवरही प्रतिकूल प्रभाव पडणार आहे. धरणामुळे ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहावर चीनचे नियंत्रण येईल आणि ईशान्येत पाण्याची टंचाई किंवा पूराचे संकट निर्माण होऊ शकते अशी भीती सैकिया यांनी व्यक्त केली.









