कडोली / वार्ताहर
बस वाहतूक अनियमितपणाचा कळस गाठल्याने मण्णीकेरी येथे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी रास्तारोको करून संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी येण्यास भाग पाडले.
गेले काही महिने झाले मण्णीकेरी गावाला वारंवार बसच्या फेऱ्या अनियमित सुरू होत्या. त्यामुळे शहराकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी पंचाईत होत होती. वेळेवर बस येत नसल्याने विद्यार्थी शाळेत गैरहजर राहत होते. प्रसंगी एक दोन कि. मी. पायी जात अन्य गावची बस पकडावी लागत होती. अनेकवेळा सांगून बस वेळेवर येत नव्हती. शेवटी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी रास्तारोकोचे हत्यार उपसले आणि रास्तारोको करून सर्वांची कोंडी केली. रास्तारोकोची माहिती कळताच बस वाहतूक मंडळाचे अधिकारी एस. एच. अधिवंत, काकती पोलीस ठाण्याचे पीएसआय घटनास्थळी येऊन मण्णीकेरी गावची बससेवा वेळेवर आणि सुरळीत सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या समस्यांची दखल घेऊन ग्रामपंचायत अध्यक्षा काशव्वा होसमळी, ग्रा. पं. सदस्य मल्लाप्पा द•ाrकर, बाळू गुडाजी, बाळू हडलगी, हेमाण्णा पाटील, माऊती मास्तोळी आदींसह ग्रामस्थांनी सहभाग होऊन रास्तारोको यशस्वी केला.









