विरोधी गटातील नगरसेवकांची मनपा आयुक्तांकडे मागणी
बेळगाव : महापालिकेच्या महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांना महापालिकेच्या सेवेतून मुक्त करण्यात यावे, असा ठराव सत्ताधारी गटाच्यावतीने करण्यात आला होता. याविरोधात आता विरोधी गट एकवटला असून सोमवारी महापालिका आयुक्त शुभा बी. यांना निवेदन देऊन महसूल आयुक्तांवरील कारवाई रोखावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. गुरुवार दि. 25 सप्टेंबर रोजी बेळगाव महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली. या सभेवेळी महसूल उपायुक्तांविरोधात ठराव पारित करून तो राज्य सरकारला पाठविण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात महसूल विभागात मोठा गोंधळ झाला असून या सर्व कारभाराची चौकशी करण्याची मागणी सत्ताधारी गटाने केली होती.
दोषींवर कारवाई व्हावी
महसूल उपायुक्तांच्या समर्थनार्थ विरोधी गट एकवटला आहे. त्यांच्यावर झालेल्या सर्व आरोपांची सखोल चौकशी होऊन जर त्या दोषी आढळल्या तरच त्यांच्यावर कारवाई व्हावी. तसेच राज्य सरकारला पाठविण्यात आलेल्या ठरावाची प्रत ही अत्यंत चुकीची असल्याचे मत विरोधी गटातील नगरसेवकांनी मनपा आयुक्तांकडे व्यक्त केले. यावेळी विरोधी गटातील नगरसेवक मुजम्मिल डोणी, रवी साळुंखे, रियाज किल्लेदार, रेश्मा भैरक्कदार, शिवाजी मंडोळकर, बसवराज मोदगेकर, दिनेश नाशीपुडी, समीउल्ला माडीवाले यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते.









