दरवाजा-खिडक्या-पाण्याच्या टाकीची मोडतोड : काचाही फोडल्याने नुकसान
वार्ताहर/उचगाव
सुळगा (हिं.) येथील शेतकरी शिक्षण सेवा समिती संचलित ब्रह्मलिंग हायस्कूलच्या इमारतीवरती काही विघ्नसंतोषी लोकांनी दगडफेक करून शाळेच्या इमारतीचे नुकसान केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. यामुळे सुळगा आणि परिसरातील नागरिकांतून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. सुळगा गावांमध्ये ब्रह्मलिंग माध्यमिक हे एकमेव विद्यालय असून या शाळेतून अनेक विद्यार्थी शिकून अनेक क्षेत्रात उच्च पदावरती सध्या कार्यरत आहेत. मात्र काही विघ्नसंतोषी लोकांना या संस्थेची आणि शाळेची होत असलेली प्रगती पहावत नसल्याने सूडबुद्धीच्या भावनेतून सोमवारी रात्री शाळेच्या संरक्षक भिंतीवरून आणि गेटवरून उड्या मारून आत प्रवेश करून दरवाजांची मोडतोड तसेच खिडक्यांना असलेल्या काचांची तोडफोड याबरोबरच पाण्याचे नळ, पाण्याची टाकी यांची मोडतोड करून अस्ताव्यस्त टाकल्याचे दिसून येत होते. यामध्ये बरेच मोठे नुकसान करण्यात आले आहे. शाळा ही विद्येचे माहेरघर असे म्हटले जाते. ज्या सरस्वतीच्या मंदिरातून आपण ज्ञानाचे धडे घेऊन आयुष्यात मोठे होतो. अशा या सरस्वतीच्या मंदिरावरती दगडफेक करणे हे अशोभनीय कृत्य आहे, अशी चर्चा ग्रामस्थ आणि पालकांमधून तसेच अनेक माजी विद्यार्थ्यांमधून करण्यात येत आहेत.
पोलिसांकडून पंचनामा
सदर घटनेची काकती पोलीस स्टेशनमध्ये नोंद केली असून मंगळवारी सकाळी पोलीस खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुळगा ब्रह्मलिंग हायस्कूलला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला आहे. आणि पुढील तपास करून अशा विघ्नसंतोषी लोकांना तातडीने अटक करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले आहे.









