रायपूर :
छत्तीसगडमध्ये महासमुंद बागबहरा रेल्वेस्थानकादरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस टेनवर शनिवारी दगडफेक करण्यात आली. दगडफेकीमुळे टेनच्या एस2-10, एस4-1, एस9-78 या तीन डब्यांच्या काचा फुटल्या. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या पाच आरोपींना अटक केली आहे. रेल्वे कायदा 1989 अंतर्गत या सर्वांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना कोठडी ठोठावण्यात आली. या मार्गावर 16 सप्टेंबरपासून दुर्ग ते विशाखापट्टणमपर्यंत वंदे भारत रेल्वे सुरू होणार आहे. त्यापूर्वी चाचणीच्या निमित्ताने 14 सप्टेंबर रोजी रेल्वे महासमुंदच्या बागबहारा स्टेशनजवळ पोहोचल्यावर दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरातील नागरिक दगडफेक करणाऱ्यांविरोधात संतापले आहेत.









